महापुराबाबत जलसंपदा मंत्र्यांचा गृहपाठ कच्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:56+5:302021-07-26T04:24:56+5:30
सांगली : कृष्णा, वारणा नदीच्या महापुराचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना आश्वस्त ...
सांगली : कृष्णा, वारणा नदीच्या महापुराचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना आश्वस्त केले होते. मात्र, त्यांचा महापुराबाबतचा गृहपाठ कच्चा राहिला. महापुराऐवजी सांगलीकरांचाच करेक्ट कार्यक्रम झाला. जलसंपदा मंत्र्यांनी या महापुराच्या नियंत्रणात आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून दुसरे खाते घ्यावे, अशी टीका सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केली.
ते म्हणाले, मंत्री पाटील यांनी पाणी पातळी ४८ फुटांपेक्षा अधिक होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यांचा पक्का अभ्यास असावा. पाटबंधारे विभागानेही ५२ फुटांपर्यंत पाणी जाईल, असे सांगितले. त्यामुळे काही भागातील लोक निर्धास्त होते. परंतु, सांगलीत महापुराचे पाणी ५५ फुटांपर्यंत वाढले. २०१९च्या महापुरातून धडा घेत हजारो लोक घर सोडून सुरक्षितस्थळी गेले. अन्यथा जलसंपदा विभागाच्या माहितीवर विश्वास ठेवला असता तर अडचण झाली असती. पाटील यांनी सांगलीत तळ ठोकायला हवा होता. कोरोना आणि महापूर या दोन्ही संकटात पालकमंत्री म्हणून त्यांनी काय जबाबदारी पार पाडली, याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे.
महापुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातील नव्वदहून अधिक गावे बाधित झाली आहेत. राज्य शासनाने तातडीची आणि अधिक मदत जाहीर करून ती तत्काळ हातात येईल, अशी व्यवस्था करावी. आरोग्याच्या सुविधा मोफत पुरवाव्यात. मदत जाहीर करताना घरात किती पाणी होते, याचे फूटपट्टी घेऊन मोजमाप करण्याची गरज नाही. पुराचे पाणी आलेल्या भागात सरसकट मदत द्यावी. व्यापाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे. छोट्या व्यापाऱ्यांनाही मदत जाहीर करावी, अशी मागणी पवार यांनी केली.