आठ वर्षीय जिनिशाच्या प्रामाणिकपणाने सर्वांचे मन जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:52+5:302021-01-15T04:21:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील गुडमॉर्निंग ग्रुपचे सदस्य हरणे बंदर येथे मासे खरेदी करत असताना एका कोळ्याच्या ...

The honesty of eight-year-old Jinisha won everyone's heart | आठ वर्षीय जिनिशाच्या प्रामाणिकपणाने सर्वांचे मन जिंकले

आठ वर्षीय जिनिशाच्या प्रामाणिकपणाने सर्वांचे मन जिंकले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : येथील गुडमॉर्निंग ग्रुपचे सदस्य हरणे बंदर येथे मासे खरेदी करत असताना एका कोळ्याच्या तिसरीतील ८ वर्षीय मुलीचा प्रामाणिकपणा पाहून सर्वांचे हृदय हेलावले.

आष्टा महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज सकाळी येणाऱ्या या गुडमॉर्निंग ग्रुपची सहल मुरुड-जंजिरा, हरिहरेश्वर तसेच हरणे बंदर याठिकाणी गेली होती. या सहलीत अरुण शिंदे, संदीप सावंत, दीपक सुर्वे, सतीश गोंदकर, आर. डी. पाटील, मानसिंग जाधव, प्रकाश शिंदे, अतुल जाधव, सुधाकर सावंत, नितीन मोहिते, राजाराम मगदूम गेले होते.

हरणे बंदर येथे मोठा मासे बाजार असतो. सर्वजण या बाजारात गेल्यानंतर एका कोळी महिलेकडून त्यांनी मासे खरेदी केले. मासे स्वच्छ करण्यासाठी जवळील मुलीच्या हातात दिल्यानंतर ती सफाईदारपणे मासे स्वच्छ करत होती. यावेळी गुडमॉर्निंग ग्रुपच्या संदीप सावंत, अरुण शिंदे यांनी या मुलीशी संवाद साधला. तेव्हा तिने आपले नाव जिनिशा असून, इयत्ता तिसरीत असल्याचे सांगितले. तिचे वडील मासे पकडण्यासाठी ८ ते १० दिवस समुद्रावर जात असतात. ती सर्वात मोठी असून, आणखी दोन बहिणी आहेत. कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे शाळा बंदच आहे. त्यामुळे मासे स्वच्छ करण्याबरोबर आईला दिवसभर साथ देते, अशी माहिती मिळाली. याचवेळी जिनिशाचा वाढदिवस असल्याचे समजल्यानंतर गुडमॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी तिला खाऊ दिला.

खेळण्या-बागडण्याच्या व शिक्षण घेण्याच्या काळात जिनिशा आईला मदत करत होती. लहान वयात ती करत असलेले काम पाहून तिचे कौतुक वाटले. मासे स्वच्छ झाल्यानंतर सर्वजण मासे घेऊन गाडीजवळ आले. एवढ्यात धावतपळत जिनिशा व तिची आई दोघीही विसरलेली माशाची पिशवी परत द्यायला आल्या. तिच्या हातात सरबताचा ग्लास अर्धवटच होता. हजारो रुपयांचे मासे प्रामाणिकपणे परत करीत तिने माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले. तिच्या या प्रामाणिकपणाचे सर्वांनीच कौतुक केले तिचे व तिच्या आईचे आभार मानले.

फोटो - १३०१२०२१-आयएसएलएम-आष्टा न्यूज

Web Title: The honesty of eight-year-old Jinisha won everyone's heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.