Crime News: आष्ट्यात विवाहितेकडून ‘हनीट्रॅप’, अनेकांना लाखोंचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:06 PM2022-07-16T19:06:34+5:302022-07-16T19:07:39+5:30
माजी नगरसेवकाच्या मदतीने संबंधित महिलेने राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी, व्यावसायिक व विमा क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढले.
आष्टा : देश-विदेशात शत्रू राष्ट्रातील अधिकाऱ्यांना, जवानांना हनीट्रॅपमध्ये अडकवून संबंधित देशातील गुप्त माहिती घेतली जाते, मात्र आष्टा शहरात एका विवाहित महिलेने ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून अनेकांना लाखोंचा गंडा घातला आहे. याबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू आहे
आष्टा शहरातील एक माजी नगरसेवक व महिला एकाच पक्षात होते. त्यांची जवळीक वाढत गेली. माजी नगरसेवकाच्या मदतीने संबंधित महिलेने राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी, व्यावसायिक व विमा क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान संबंधित महिला काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. याचा जाब महिलेच्या पतीने संबंधित नगरसेवकाला विचारल्यानंतर दोघांच्यात मारामारी झाली. याची पोलिसात तक्रार होण्यापूर्वीच हे प्रकरण मिटवण्यात आले, अशी चर्चा आहे.
संबंधित सौंदर्यवती कोण तिने कोणाकोणाला आपल्या जाळ्यात ओढले व कोणाकडून पैसे व सोने उकळले याची शहरात खुमासदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसचे राज्याचे सचिव विनय कांबळे यांनी आष्टा पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे हनीट्रॅपमधील मासे गळाला लागणार का? याची चर्चा रंगू लागली आहे.