रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित
By admin | Published: October 18, 2015 11:04 PM2015-10-18T23:04:16+5:302015-10-18T23:35:08+5:30
जत तालुक्यात खरीप वाया : चाऱ्याचा प्रश्न तात्पुरता मिटणार; पेरणी अंतिम टप्प्यात
गजानन पाटील-- संख--गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यातील रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाअभावी सलग तिसऱ्या वर्षी खरीप हंगाम वाया गेला होता; परंतु परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये समाधानकारक हजेरी लावली आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागाचा अपवाद वगळता पाऊस झाल्याने हंगाम पार पडण्याची शक्यता आहे. रानात खुरटे गवत आल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. सर्वत्र पेरणी सुरू झाल्याने मजुरीच्या व बैलजोडीच्या दरात वाढ झाली आहे.
यंदा मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली होती. आॅगस्ट महिन्यामध्ये ५४ गावांत ४७ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. अशावेळी सर्व मदार परतीच्या पावसावर अवलंबून होती.परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये हजेरी लावली. गेल्या आठवड्यामध्ये पाऊस समाधानकारक पडल्याने पेरणीला सुरुवात होऊन ६७ टक्के पेरणी झाली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३ मिलिमीटर असून, आजअखेर २२६.८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरी ४८ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पाऊस न झाल्याने एकही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही.
पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे. रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर इतक्या प्रचंड क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते.
त्याशिवाय करडई २ हजार हेक्टर, सूर्यफूल ३ हजार १०० हेक्टर, गहू २ हजार ३०० हेक्टर, हरभरा २ हजार हेक्टर, मका ३ हजार ४०० हेक्टर क्षेत्रात घेतला जातो. उर्वरित इतर गळीत धान्ये घेतली जातात. बाजारात ज्वारीचे मालदांडी (३५-१), स्वाती (एस ९ आर) बियाणे उपलब्ध आहे. याशिवाय संकरित ज्वारीचे, सी-सी एच ८ आर, ही घरगुती बियाणे पेरली जातात. मक्याचे पारस, विजय, महाबीज, गंगा, कावेरी, मायको तसेच सूर्यफुलाचे महिको, विजय, महाधन, गंगा, कावेरी वाणांची बियाणे उपलब्ध आहेत.
पेरणी सर्वत्र सुरू झाल्याने जत बाजारपेठेत, तहसील कार्यालय, गावात स्टॅन्डवर नेहमीसारखी गर्दी दिसून येत नाही. सर्वत्र कामाची धांदल सुरू झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे, खताचे दर गेल्यावर्षीपेक्षा १० टक्क्याने वाढले आहेत. आगाप पेरणी झालेल्या ठिकाणी अनुकूल हवामान, पाऊस यामुळे उगवण चांगली झाली आहे.
पाऊस दमदार झाला नसल्याने जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. अजूनही उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद, बेवनूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, येळवी, अंतराळ, बसरगी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव, लकडेवाडी या २४ गावांत ३१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पावसाने दिलासा : बैलजोडीचा भाव वाढला
दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. पेरणी सर्वत्र सुरू झाल्याने बैलजोड्यांना मागणी वाढली आहे. ट्रॅक्टरपेक्षा बैलजोड्यांद्वारे पेरणी केल्यास पिकांची उगवण चांगली होते, असे शेतकऱ्यांचे मत आहे. पेरणीसाठी बैलजोडीचा दर १७०० ते २ हजार रुपये इतका आहे. १ दिवसासाठी पुरुषास २०० रुपये, तर स्त्री मजुरासाठी १५० रुपये मजुरी आहे.