नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजाराला ऊत

By admin | Published: June 18, 2015 11:56 PM2015-06-18T23:56:05+5:302015-06-19T00:26:05+5:30

जत नगरपालिका : इच्छुकांकडे १५ लाखांपर्यंतची नगरसेवकांची मागणी

The horse market for the post of city president | नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजाराला ऊत

नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजाराला ऊत

Next

जत : जत नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांचा घोडेबाजार सुरू झाला आहे. एका नगरसेविकेच्या पतीने मतदान करण्यासाठी पंधरा लाख रुपये इच्छुक उमेदवारांकडे मागितले आहेत. यामुळे इच्छुक उमेदवाराचे धाबे दणाणले आहेत.नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. सत्ताधारी वसंतदादा विकास आघाडीचे आठपैकी सात व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तीनपैकी दोन असे एकूण नऊ नगरसेवक सहलीवर गेले आहेत. सत्ताधारी गटातील नगरसेवक मनोहर पट्टणशेट्टी हे मागील दीड वर्षापासून गंभीर आजारी असल्याने ते घरीच आहेत.
नगरपरिषद विरोधी गटनेते परशुराम मोरे यांनी परिवर्तन पॅनेलप्रमुख विक्रम सावंत यांना गाफील ठेवून विरोधी गटातील सहा व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला एक नगरसेवक अशी सातजणांची गोळाबेरीज करून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विरोधी गटातील एक नगरसेवक विक्रम सावंत यांच्यासोबत आहेत व सहलीवर गेलेल्या एका महिला नगरसेवकाच्या मुलाने सावंत यांची भेट घेऊन आम्ही कुठेही जाणार नाही, तुमच्या सोबतच आहे, असे प्रत्यक्ष येऊन सांगितले आहे. त्यामुळे विरोधी गटनेते परशुराम मोरे व माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी सुरेश शिंदे यांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे.
आ. विलासराव जगताप यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. परंतु जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी व शिंदे यांची पालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी नगरसेवक उमेश सावंत यांना विरोधी परिवर्तन पॅनलच्या कळपात सोडून नगरसेवक श्रीकांत शिंदे व हेमलता चव्हाण यांच्या मोरे यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. ही योजना अंमलात येण्यापूर्वीच शिंदे यांनी श्रीकांत शिंदे व चव्हाण या दोन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना घेऊन सहलीवर पाठविले आहे. (वार्ताहर)

परिवर्तन पॅनेलप्रमुख विक्रम सावंत व आमच्यात मतभेद नाहीत, त्यांचे काही नगरसेवक सोबत घेऊन आम्ही नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीप्रमाणे आगामी बाजार समिती निवडणुकीत आम्ही एकत्र राहणार आहे.
- सुरेश शिंदे
माजी सभापती, बाजार समिती


नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हा सत्ताधारी वसंतदादा विकास आघाडीचाच होणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यात व सुरेश शिंदे यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न विरोधकांनी फोडा-फोडीचे राजकारण करून केला आहे. त्यांचा तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.
- विक्रम सावंत
जिल्हा बॅँक, संचालक

कॉँग्रेस जिल्हाध्यक्षांचे प्रयत्न अयशस्वी
सांगली जिल्हा कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहनराव कदम यांनी परिवर्तन पॅनेलमधून नाराज होऊन बाहेर गेलेले व उमेदवारी अर्ज दाखल केलेले नगरपरिषद विरोधी गटनेते परशुराम मोरे यांची जत येथे येऊन भेट घेतली व उमेदवारी पाठीमागे घेण्यासाठी विनंती केली आहे. परंतु त्यांची विनंती त्यांनी मान्य केली नाही.

Web Title: The horse market for the post of city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.