मिरजेतील शंभर कोटींच्या रस्त्याचे घोडे पुन्हा अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 11:47 PM2019-01-09T23:47:42+5:302019-01-09T23:48:17+5:30
मिरजेत रस्ता दुरुस्तीकरिता वारंवारच्या आंदोलनांमुळे शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र तांत्रिक मंजुरीअभावी १०० कोटी खर्चाच्या या रस्त्याचे नूतनीकरण रखडण्याची चिन्हे
मिरज : मिरजेत रस्ता दुरुस्तीकरिता वारंवारच्या आंदोलनांमुळे शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्कचे काम करण्यात आले. मात्र तांत्रिक मंजुरीअभावी १०० कोटी खर्चाच्या या रस्त्याचे नूतनीकरण रखडण्याची चिन्हे आहेत. परिणामी रस्त्याचा शंभर कोटीचा खर्च निवडणूक आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे.
मिरजेतील तानंग फाटा ते म्हैसाळ रेल्वे उड्डाण पुलापर्यंतचा रस्ता शंभर कोटी रुपये खर्च करून नव्याने करण्याची घोषणा लोकप्रतिनिधींनी केली होती. प्रत्यक्षात यापैकी शिवाजी रस्त्याचे केवळ पॅचवर्क करण्यात आले. मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी करणाºया प्रशासनाने १०० कोटीच्या रस्ते कामाचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक करीत आहेत.
शिवाजी रस्त्याचे वर्षभर रखडलेले काम सुरु करण्यासाठी उपोषण व आंदोलनांमुळे या रस्त्याचे पॅचवर्क करण्यात आले. शहरातील या प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरणाची घोषणा करुन, तात्पुरती मलमपट्टी केल्याबाबत विरोधक टीका करीत आहेत.
रस्त्याची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली असून आराखड्याप्रमाणे या रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभिकरण करण्याची मागणी होत आहे.शिवाजी रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामुळे वर्षभर अनेक अपघात झाल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. शहरातील या प्रमुख रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाºयांनी प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन करून रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. या दबावामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शंभर कोटी खर्चाची घोषणा करुन, रस्त्याची केवळ दुरुस्ती केल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे.
मंजुरीची प्रतीक्षा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस. के. कदम यांनी, मिरजेतील शंभर कोटींच्या रस्तेकामाबाबत त्रुटी असल्याने हे काम सुरू होण्याबाबत दिल्लीतून मंजुरीची प्रतीक्षा सुरू असल्याचे सांगितले. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम कधी सुरू होईल, याबाबत निश्चित सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले.
दिल्लीला जाणार : खाडे
रस्त्याच्या तांत्रिक मंजुरीतील त्रुटी दूर करण्यासाठी स्वत: दिल्लीला जाणार असल्याचे आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहितेपूर्वी रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.