सांगली जिल्हा परिषदेत वसतिगृह कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 03:11 PM2019-06-28T15:11:18+5:302019-06-28T15:12:29+5:30
इस्लामपूर येथील व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर विद्यालयातील कारभाराची चौकशी करावी, तसेच याप्रकरणी प्रशासनाकडून कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ विद्यालयाचे कर्मचारी जयवंत जाधव यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. विद्यालयामधील मूकबधिर विद्यार्थ्यांचे शोषण केले जात असून याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
सांगली : इस्लामपूर येथील व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर विद्यालयातील कारभाराची चौकशी करावी, तसेच याप्रकरणी प्रशासनाकडून कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ विद्यालयाचे कर्मचारी जयवंत जाधव यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. विद्यालयामधील मूकबधिर विद्यार्थ्यांचे शोषण केले जात असून याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
आंदोलनाबाबत निवेदनात म्हटले आहे की, मूकबधिर विद्यालयाच्या संस्थेचे सचिव अभिमन्यू रानमाळे, खजिनदार शोभाताई रानमाळे, वसतिगृह अधीक्षिका सुरेखा चव्हाण, मुख्याध्यापिका मनीषा शिंदे, पांडुरंग दाडमोडे यांच्याकडून संस्थेत गैरकारभार सुरू आहे. यापूर्वी याबाबत चौकशीची मागणी केल्यानंतर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपासणी पथकाने चौकशी केली. यात संस्थाचालक, संस्था दोषी असल्याचे स्पष्ट होऊनही दोषींवर कारवाई करण्यात येत नाही.
याच मागणीसाठी गुरुवारी मूकबधिर शाळेचे कर्मचारी जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. जाधव यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी त्यांना प्रतिबंध केला. यावेळी झटापटही झाली.
यावेळी जयश्री पाटील, शशिकला माने, रुपाली जाधव, गंगुबाई कांबळे, रेश्मा कांबळे आदी उपस्थित होत्या.