वसतिगृहातील सबठेकेदारी रद्द

By admin | Published: December 5, 2014 10:42 PM2014-12-05T22:42:08+5:302014-12-05T23:33:53+5:30

समाजकल्याण विभागाचा निर्णय : आटपाडीच्या अधीक्षकाची उचलबांगडी--लोकमतचा दणका

Hostel subdivision cancellation | वसतिगृहातील सबठेकेदारी रद्द

वसतिगृहातील सबठेकेदारी रद्द

Next

सांगली : ‘लोकमत’मधून ‘वसतिगृहातील ठेकेदारी’ या मथळ्याखाली मालिका प्रसिध्द झाल्यानंतर समाजकल्याण विभाग खडबडून जागा होऊन त्यांनी वसतिगृहातील सबठेकेदारी बंद केली आहे. येथील विद्यार्थ्यांना मुख्य ठेकेदार कर्मचारी नियुक्त करून भोजन देण्यात येईल, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी शुक्रवारी जाहीर केले. तसेच त्यांनी आटपाडी आणि कवठेमहांकाळ येथील वसतिगृहांना भेट देऊन, जेवणाची तपासणी केली आहे. आटपाडी मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षक एस. एस. थोरात यांची उचलबांगडी करून त्यांची मुलांच्या वसतिगृहात नियुक्ती केली आहे. येथेही महिन्यात कारभार सुधारला नाही, तर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, असा इशाराही घाटे यांनी त्यांना दिला आहे.
मुंबई येथील ‘क्रिस्टल गॉरमेट’ या कंपनीला पुणे विभागातील ३६ वसतिगृहांना जेवण पुरवठा करण्याचा ठेका दिला आहे. ही संस्था एका बड्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीच आहे. संबंधित संस्थेकडे एवढ्या मोठ्याप्रमाणात जेवण पुरवठा देणारी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे त्यांनी उपठेकेदारांची नियुक्ती केली आहे. सांगलीतील एका पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्याने राजकीय वजन वापरून पुणे विभागातील ३६ पैकी २३ वसतिगृहांमध्ये जेवण पुरवण्याचा उपठेका मिळविला आहे. पुन्हा या युवा पदाधिकाऱ्याने आपली मलई बाजूला ठेवून कवडीमोल किमतीला तिसऱ्याला ठेका दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच सांगली जिल्ह्यात मुली आणि मुलांची १८ वसतिगृहे असून, येथील जेवणाचे सबठेकेही विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ‘क्रिस्टल गॉरमेट’ कंपनीने दिले होते. या ठेकेदारीतून विद्यार्थ्यांचे हाल, तर ठेकेदार गब्बर होत असल्याच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकला होता. यानंतर विशेष समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. त्यांनी ‘क्रिस्टल गॉरमेट’ या कंपनीला सबठेकेदारी रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व वसतिगृहांतील सबठेकेदारी ‘क्रिस्टल गॉरमेट’ कंपनीने रद्द केली आहे. सध्या ही संस्था कर्मचारी नियुक्त करून ठेका चालवत आहे, अशी माहिती सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.
दरम्यान, घाटे यांनी आटपाडी येथील मुली व मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी अधीक्षक एस. एस. थोरात यांच्याविरोधात मुलींनी प्रचंड तक्रारी केल्या. यामुळे घाटे यांनी तात्काळ शुक्रवारीच थोरात यांच्याकडील त्या वसतिगृहाचा पदभार काढून घेतला आहे. तसेच महिन्यात थोरात यांनी कारभार सुधारला नाही, तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, असा इशाराही घाटे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

कर्मचारी नियुक्त
क्रिस्टल गॉरमेट या संस्थेने सबठेकेदार रद्द करून भोजन देण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु, ही केवळ कागदोपत्रीच दुरुस्ती असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे.
विद्यार्थ्यांना दाखवूनच भाजीपाल्यासह धान्य खरेदीच्या अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराला सूचना

Web Title: Hostel subdivision cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.