Sangli News: वसतीगृह अधीक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यांना केली अमानुष मारहाण, विद्यार्थ्यांकडून आत्महत्येचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 01:36 PM2023-02-01T13:36:12+5:302023-02-01T13:37:06+5:30
तर रेक्टर आम्हाला आणखी मारतील, तुम्ही जर आजच्या आज आम्हाला इथून घेऊन गेला नाही, तर जिवाचं काहीतरी करुन घेऊ
दत्ता पाटील
तासगाव : शाळेच्या नावावर हॉटेलमधून चहा आणला या रागातून शहरातील एका विद्यालयाच्या वसतीगृहातील अधीक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समजल्यावर पालक वसतीगृहात येऊन विद्यार्थ्यांना घरी घेऊन गेले. या दोनही विद्यार्थ्यांवर गावातील एका दवाखान्यात उपचार सुरु आहेत. संबंधित रेक्टरवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी व्यवस्थापनाकडे केली आहे.
सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावचे जितेंद्र दरीनाथ बजबळे आणि बालाजी दरीनाथ बजबळे हे जुळे भाऊ तासगाव शहरातील एका मोठ्या विद्यामंदिरात सहावीच्या वर्गात शिकायला आहेत. दोघे भाऊ विद्यामंदीराच्या वसतीगृहात राहतात. रविवारी (दि.२९ जानेवारी) सकाळी वसतीगृहातील विद्यार्थी बाहेर जाऊन चहा घेऊन आले होते. त्या सर्वांनी वसतीगृहामध्ये चहा घेतला. हे निदर्शनास येताच शिपायाने त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. नंतर वसतीगृहाच्या अधीक्षकाने प्लंबिंग पाईपने या दोन जुळ्या भावांसह चार विद्यार्थ्यांना अमानुषपणे बदडून काढले.
मारहाणीमुळे घाबरलेल्या बालाजी बजबळे या विद्यार्थ्याने एका शिक्षिकेचा मोबाईल घेऊन घरी वडिलांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर त्याचे वडील तासगाव येथील वसतीगृहात येऊन दोन मुलांना घरी घेऊन गेले आहेत. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
दरम्यान आमदार सुमनताई पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संस्था व्यवस्थापकांना फोन करून वसतीग्रह अधीक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांकडून आत्महत्येचा इशारा
बालाजी बजबळे या विद्यार्थ्यांने वडिलांना फोन करून मारहाणीची माहिती दिली. त्यावेळी वडिलांनी याबाबत शिक्षकांना जाब विचारु का असे विचारले होते, परंतु विद्यार्थ्यांने ठाम नकार दिला. तुम्ही शाळेत विचारणा कराल तर रेक्टर आम्हाला आणखी मारतील, तुम्ही जर आजच्या आज आम्हाला इथून घेऊन गेला नाही, तर जिवाचं काहीतरी करुन घेऊ असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळेच वडील तात्काळ येऊन त्यांना घरी घेऊन गेले आहेत.