तासगावात राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले, पण सेनापती कुठाय?

By admin | Published: June 26, 2016 11:32 PM2016-06-26T23:32:21+5:302016-06-27T00:45:36+5:30

तासगाव शहराध्यक्षपद रिक्त : अजय पाटील, अमोल शिंंदे यांच्या नावाची केवळ चर्चाच; सेनापतीच नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

In the hot seat, the NCP blew the trumpet, but the commander? | तासगावात राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले, पण सेनापती कुठाय?

तासगावात राष्ट्रवादीने रणशिंग फुंकले, पण सेनापती कुठाय?

Next

दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी लढाईची पूर्वतयारी सुरू केली आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगावात येऊन कार्यकर्त्यांना रिचार्ज करीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले, पण सेनापतीच नसल्याने सैन्य संभ्रमात सापडले आहे. सेनापतीशिवाय सैन्य धावणार तरी कसे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक महिन्यांपासून तासगाव शहराध्यक्षपद रिक्त आहे. नगरसेवक अमोल शिंंदे आणि अजय पाटील यांच्या नावाची केवळ चर्चा होत आहे. मात्र निर्णय झाला नाही. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पश्चात तालुक्यातील ग्रामीण भागाच्या तुलनेत तासगाव शहरात राष्ट्रवादीची मोठी वाताहत झाली. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली पालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात गेली. पक्षातील चार नगरसेवक भाजपच्या वळचणीला गेले, तर नेत्यांचा आदेश धुडकावून काही नगरसेवकांनी भाजपच्या नगराध्यक्ष निवडीसाठी रसद पुरवली. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीचे अस्तित्व शोधण्याची वेळ आली. अमोल शिंंदे यांचा अपवाद वगळता सर्वच नगरसेवकांनी भाजपशी सत्तेची सोयरिक केली होती.
आता पालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. राष्ट्रवादीकडूनही विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न होत आहे. काही दिवसांपूर्वी बाजार समितीत आर. आर. पाटील यांच्या पुतळा अनावरणाच्या निमित्ताने अजित पवार तासगावात आले होते. मेळाव्याचे निमित्त साधून त्यांनी तासगाव नगरपालिका निवडणुकीचे रणशिंंग फुंकले.
निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राष्ट्रवादीत उत्साह संचारला आहे. मात्र सेनापती म्हणून पक्षाची जुळवाजुळव करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. अनेक पदाधिकाऱ्यांचा कारभार ‘एकला चलो रे’प्रमाणे सुरू आहे. आर. आर. पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदाची धुरा महादेवराव हिंंगमिरे यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्या निधनानंतर अद्यापपर्यंत हे पद रिक्त आहे.

चर्चा झाली, पुढे काय?
शहराध्यक्ष निवडीसाठी काही महिन्यांपूर्वी सूतगिरणीत शहरातील कार्यकर्त्यांची आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यावेळी अमोल शिंंदे आणि अजय पाटील यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र या बैठकीनंतर निवडीबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे शहराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याची कार्यकर्त्यांत उत्सुकता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षांची निवड केली जाईल, अशी चर्चाही आहे. मात्र सध्या तरी शहरात सेनापतीशिवाय राष्ट्रवादीचे सैनिक असल्याचे चित्र आहे.

Web Title: In the hot seat, the NCP blew the trumpet, but the commander?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.