परवानगीनंतरही हॉटेल चालकांचा दारू विक्रीस नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 07:29 PM2020-05-20T19:29:57+5:302020-05-20T19:30:09+5:30
मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यास परवानगी देताना, त्यांना छापील किमतीत विक्री करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे अशी विक्री परवडणारी नसल्याचे स्पष्ट करीत, परमीट रुम व बिअरबार चालकांनी नकार दिला आहे.
सांगली : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य सर्व ठिकाणच्या परमीट रुम, बिअरबारमधील मद्यसाठा विक्रीस परवानगी दिली. मात्र छापील किमतीतच त्याची विक्री करण्याचे बंधन घातले असून, त्यांना लागू असलेले सर्व करही भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे छापील किमतीत दारुविक्री करणे परवडणारे नसल्याने चालकांनी त्यास नकार दिला आहे.
सांगलीसह राज्यातील सर्व ठिकाणचे परमीट रुम व बार चालकांनी याबाबत असमर्थता दर्शविली आहे. वाईन शॉप व बिअर शॉपींना ठराविक कर लागू आहेत, मात्र परमीट रुम व बार चालकांना अन्य करही भरावे लागतात. त्यामुळे हॉटेल्समधील दारु जादा दराने त्यांना विकावी लागते. लॉकडाऊन काळात हा साठा संपविण्यासाठी चालकांनी शासनाकडे त्याच्या विक्रीची परवानगी मागितली होती. मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यास परवानगी देताना, त्यांना छापील किमतीत विक्री करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे अशी विक्री परवडणारी नसल्याचे स्पष्ट करीत, परमीट रुम व बिअरबार चालकांनी नकार दिला आहे.
राज्यात सर्वच परवानाधारक हॉटेल्समधील साठा मोठा आहे. बिअरची खरेदी मार्चमध्ये करण्यात आली होती. अनेकांकडील बिअर साठा मुदतबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हॉटेलचालक चिंतेत सापडले आहेत. सांगलीत बुधवारी खाद्यपेय विक्रेता मालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून, अशा विक्रीस नापसंती दर्शविली. राज्यभरातील परवानाधारक हॉटेलचालकही यास तयार नसल्याचे चित्र आहे. छापील किमतीत विक्री केल्यास हॉटेलचालकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. केवळ विक्रीसाठी हॉटेलसाठी लागू असलेले सर्व कर त्यांना भरावे लागणार आहेत.
शॉपइतकेच कर घेण्याची मागणी
वाईन शॉपपेक्षा अधिकचे कर रद्द केल्यास हॉटेलचालकांना मद्यविक्री छापील किमतीत करणे परवडणारे ठरेल, अन्यथा यापूर्वी हॉटेलचालक ज्या दरात ग्राहकांना मद्यविक्री करीत होते, त्या दरात विक्री करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी खाद्य-पेय विक्रेता मालक संघाने केली आहे.