हॉटेल कामगाराचा खून भानामतीच्या संशयातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:22 PM2019-03-10T23:22:07+5:302019-03-10T23:22:12+5:30
सांगली : हॉटेल कामगार सुरेश पाष्टे (वय ५०) यांच्या, अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे ...
सांगली : हॉटेल कामगार सुरेश पाष्टे (वय ५०) यांच्या, अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रविवारी पहाटे यश आले. याप्रकरणी मनोज श्रीधर गाडे (४२, रा. रेळेकर प्लॉट, लिमये बंगल्याशेजारी, संजयनगर, सांगली) यास नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथून अटक करण्यात आली. पाष्टे मूळचे कोकणातील होते, ते माझ्या कुटुंबावर करणी व भानामती करतात, असा संशय मला होता, यातूनच त्यांचा खून केल्याची कबुली गाडे याने दिली आहे.
अहिल्यादेवी होळकर चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंगळवार बाजारच्या कॉर्नरवर पाष्टे यांचा शुक्रवारी रात्री चाकूने सपासप तब्बल २८ वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. पाष्टे भारती हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये काम करीत होते. शुक्रवारी कामावरुन ते घरी येत होते. मंगळवार बाजारच्या कॉर्नरवर ते आल्यानंतर गाडे याने त्यांना थांबवून चाकूने हल्ला केला होता. या मार्गावरुन वाहतूक शाखेचे पोलीस नंदकुमार पाटील व इस्लामपूर पोलीस ठाण्यातील दिलीप भगत निघाले होते. ते गर्दी पाहून थांबले. त्यावेळी गाडे हा पाष्टे यांचा गळा चिरत असल्याचे त्यांना दिसले. ते त्यास पकडण्यास गेले, पण दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश पडताच गाडे त्याची दुचाकी घेऊन पळून गेला होता. यावेळी त्याच्या दुचाकीचा क्रमांक त्यांना मिळाला होता. पण अंधार असल्याने त्यांना स्पष्टपणे दिसला नव्हता. केवळ ५२३४ एवढाचा क्रमांक दिसला होता. यावरुन तपासाला दिशा देण्यात आली होती. मात्र काहीच धागेदोरे लागत नव्हते.
मृत पाष्टे व गाडे कुटुंबे शेजारीच राहतात. पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. ते एकमेकांशी बोलत नव्हते. त्यानंतर गाडेच्या वडिलांना अर्धांगवायू झाला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आईही नेहमी आजारी पडू लागल्याने अंथरुणाशी खिळून राहायची. काही वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला; पण मूलबाळ होत नव्हते. पाष्टेशी भांडण झाल्यापासून घरची अधोगती सुरू झाली आहे, कोकणातील असल्याने पाष्टे आपल्या कुटुंबावर करणी व भानामती करीत असेल, असा त्यास संशय होता. अलीकडच्या काळात तर हा संशय अधिकच बळावत गेला. त्यामुळे गाडे याने पाष्टे यांना संपविण्याचा निर्णय घेतला. पाष्टे दररोज रात्री कामावरून मंगळवार बाजारमार्गे घरी येतात, याची त्याला माहिती होती. घटनेदिवशी सायंकाळी सहा वाजता तो दुचाकीवरुन (क्र. एमएच १० बीटी-५२३४) घरातून बाहेर पडला. रात्री आठ वाजता तो मंगळवार बाजारच्या कॉर्नरवर अंधारात दबा धरुन बसला होता. रात्री साडेनऊ वाजता पाष्टे सायकलवरुन येताच त्याने त्यांच्यावर हल्ला करून खून केला.
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, दिलीप ढेरे, राजेंद्र कदम, विजय पुजारी, नीलेश कदम, अमित परीट, संजय कांबळे, सुधीर गोरे, युवराज पाटील, बिरोबा नरळे, संदीप गुरव, महादेव धुमाळ, विकास भोसले, शशिकांत जाधव, संदीप पाटील, संदीप नलावडे, सचिन सूर्यवंशी, अमोल क्षीरसागर, दिलीप भगत, नंदकुमार पाटील, सुवर्णा देसाई यांनी तपास केला.
खून करून दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडीत
जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची चार स्वतंत्र पथके स्थापन केली होती. प्रत्येक पथकाला काम वाटून दिले होते. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकास मृत पाष्टे व गाडे यांचे पंधरा वर्षांपूर्वी भांडण झाल्याची माहिती मिळाली. हा धागा पकडून पथकाने तपासाला दिशा दिली. त्याचे घर गाठले. पण तो गायब असल्याची माहिती मिळाली. तो नेहमी अक्कलकोटला स्वामी समर्थ व नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनाला जात असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही ठिकाणी जाण्याची पथकाने तयारी दर्शविली. प्रथम नृसिंहवाडीत पथक गेले. तिथे मंदिरामध्ये गाडे सापडला. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चाकू जप्त केला आहे.