खासदारांकडून तासगावातील अवैध धंदेवाल्यांचा ठेका
By admin | Published: July 21, 2016 11:39 PM2016-07-21T23:39:35+5:302016-07-22T00:03:21+5:30
महादेव पाटील : उद्यानाच्या जागेत माजी नगरसेवकाचे कार्यालय
तासगाव : तासगाव शहरातील सांगली नाका येथे वाचनालयाची इमारत आहे. या इमारतीला लागून असलेल्या उद्यानाच्या जागेवर माजी नगरसेवक मोहन कांबळे यांच्या मुलाने संपर्क कार्यालय थाटले आहे. ते बेकायदेशीर असतानादेखील खासदारांनी त्याचे उद्घाटन केले आहे. शहरातील अवैध धंदे असलेल्या गावगुंडांची पाठराखण करण्याचा ठेकाच खासदार संजयकाका पाटील यांनी घेतला असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. बेकायदेशीर खोके हटविले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.
सांगली नाका येथे काही दिवसांपूर्वी मंडळाच्या जागेवर काही नगरसेवकांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण केलेल्या इमारतीचे खासदार संजयकाका पाटील यांनी उद्घाटन केले होते. त्याबाबत शहरातील नागरिकांकडून टीकाही झाली होती. त्यानंतर पुन्हा अशाच पध्दतीने बेकायदेशीर कामांना पाठबळ देण्याचा सपाटा खासदारांकडून सुरू आहे. वाचनालयालगत उद्यानासाठीची जागा आहे. या जागेत खासदार समर्थक माजी नगरसेवक मोहन कांबळे यांच्या मुलाने खोके थाटले आहे. या खोक्याचे उद्घाटनही खासदारांनी केले होते.
या खोक्यामधून अनेक बेकायदेशीर उद्योग सुरू असतात. शहरातील अशा अनेक दोन नंबर धंद्यांची पार्श्वभूमी असणाऱ्यांना खासदारांकडून पाठबळ मिळत आहे. प्रशासनावर दबाव आणून अशाप्रकारचे उद्योग होत असल्याचा आरोपही यावेळी महादेव पाटील यांनी केला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र साळुंखे आणि महेश पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
बेकायदेशीर खोक्याबाबत मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना निवेदन दिले आहे. चार दिवसांत हा बेकायदेशीर गाळा काढण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महादेव पाटील यांनी यावेळी दिला. तसेच नागरिकांच्या मदतीने बेकायदेशीर अतिक्रमणे काढण्यासाठी स्वत: पुढाकार घेण्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.