सांगलीत घरफोडी करणारा चोरटा जेरबंद, अडीच लाखाचे दागिने जप्त
By शीतल पाटील | Published: September 19, 2022 06:04 PM2022-09-19T18:04:17+5:302022-09-19T18:04:46+5:30
अटक केलेला चोरटा रेकॉर्डवरील गुन्हेगार
सांगली : मिरजेतील मिशन हॉस्पीटल चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून घरफोडीतील चोरट्याला जेरबंद केले. संदीप यशवंत पाटील (वय २५, रा. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी अडीच लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यात घरफोडीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणातील चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी दिले होते. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या नेतृत्वाखाली खास पथक नियुक्त केले. या पथकातील हवालदार सागर लवटे यांना तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीत संदीप पाटील हा संशयित असून तो मिरजेतील मिशन हॉस्पीटल चौकात दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे एस सोन्याचे गंठण, मंगळसुत्र, कानातील टॉप्स, सोन्याचे पेंडण, चांदीचे पैजन,, जोडवी असा २ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या दागिनेबाबत तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पोलिसांनी अधिक चौकशी करता त्याने तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी व आळते या दोन गावात घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
पाटील रेकॉर्डवरील गुन्हेगार
संदीप पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बारामती शहर पोलिसांत तीन गुन्हे दाखल आहेत. या गु्न्ह्यात तो फरार आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.