शिराळ्यासह शाहुवाडीतील धबधबे हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:07 PM2019-07-24T12:07:21+5:302019-07-24T12:08:08+5:30
शिराळा तालुक्यासह नजीकच्या शाहुवाडी तालुक्यात पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, डोंगरातून अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना खुणावू लागले आहेत.
अरुण पाटील
सागाव : शिराळा तालुक्यासह नजीकच्या शाहुवाडी तालुक्यात पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, डोंगरातून अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना खुणावू लागले आहेत.
शिराळा तालुक्यातील सोनवडे—मिरुखेवाडी, गुढेपाचगणीजवळील तन्हाळी, जाधववाडीचा सवतकडा हे धबधबे अजूनही दुर्लक्षित आहेत. असाच काहीसा दुर्लक्षित असा आंबा (ता. शाहुवाडी) जवळील केर्ले धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे.
आंबा (ता. शाहुवाडी) हे ठिकाण घाटमाथ्यावरील वनराईने नटलेला थंड हवेचा रम्य परिसर. याच परिसरात अनेक लहान-मोठे धबधबे सध्या ओसंडून वाहत आहेत. केर्ले हे आंब्याजवळील अवघ्या ३00 ते ३५0 लोकवस्तीचे गाव आणि या गावाजवळूनच दोन-अडीच किलोमीटरवरील हा धबधबा पर्यटकांना साद घालतो आहे.
हेर्ले या छोट्याशा गावातून पुढे या धबधब्याच्या दिशेने जाण्यासाठी कच्चा आणि खडतर रस्ता लागतो. नागमोडी वळणे घेत अर्थात हिरवाईने नटलेल्या लहान-मोठ्या डोंगरांना वळसा घालत या धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. रोज अनेक हौशी पर्यटक येथे भेट देतात.
डोंगरकुशीत चोहोबाजूला हिरवाईकडे पाहत चिंब भिजलेले पर्यटक, तसेच वनभोजन करणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. या हंगामी धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची पावले इकडे वळताना दिसतात. अलिकडील काळात पावसाळ्यात धबधब्याची ठिकाणे पर्यटकांसाठी मोठी आकर्षणाची केंद्रे बनत असल्याचे दिसून येत आहे.