शिराळा पश्चिम भागात वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड; झाडे उन्मळून पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:50+5:302021-05-18T04:26:50+5:30
कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला सोसाट्याचा वारा कमी झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या ...
कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला सोसाट्याचा वारा कमी झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने करुंगली, शिरसटवाडी, गवळेवाडी, चिंचोली, शेडगेवाडी येथील घराचे छत उडून गेले, तर चांदोली-शेडगेवाडी मार्गावर मोठी झाडे उन्मळून पडली. त्याचबरोबर वीजसेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
शिराळा पश्चिम भागात सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पाऊस सुरूच आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेला सोसाट्याचा वारा कमी झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने करुंगली येथील बापू बंडू गुरव याच्या राहत्या घराचा छत उडून गेले आहे. शिरसटवाडी येथील राजाराम शिरसट यांच्या शेडवरील पत्रा उडून गेला आहे. चिंचोली येथील शिवाजी थोरात यांच्या घरावरील कौले तर गवळेवाडी शाळेच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने चांदोली-शेडगेवाडी मुख्य रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने आणि झाडाच्या फांद्या मोडल्याने काही काळ वाहतूक बंद होती. गावठी आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. मेणी खोऱ्यात दोन दिवसांपासून तर मणदूर येथे तीन दिवसांपासून खंडित असलेली वीजसेवा सुरू केला आहे. तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील भात पेरणीचे मुहूर्त वाया जाणार असून, २५ तारखेच्या मुहूर्तावर सर्व शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत.