ऐन सणासुदीत कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी! । आवकेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:27 PM2019-09-21T23:27:13+5:302019-09-21T23:36:08+5:30
गेल्या आठवड्यापासून कांदा दरात चांगलीच वाढ होत आहे. ४५ रुपये किलोवर असलेला दर आता ६० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. येथील फळ मार्केटमध्ये कर्नाटकसह नाशिक भागातून कांद्याची आवक होते. या आठवड्यातील आवक लक्षात घेता, शुक्रवारी अवघी ८० टन आवक झाली होती, तर शनिवारी यात वाढ होत ४०० टन कांद्याची आवक झाली आहे.
शरद जाधव ।
सांगली : अवघ्या आठ दिवसांवर आलेला नवरात्रोत्सव, त्यानंतर लागलेले दिवाळीचे वेध अशा ऐन सणासुदीच्या धामधुमीत गृहिणींच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांदा दरात लक्षणीय वाढ होत आहे. घाऊक बाजारात होत असलेल्या आवकेवर झालेला परिणामस्वरूप सध्या कांद्याचा दर प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आवक वाढली तरच दर आवाक्यात येण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यापासून कांदा दरात चांगलीच वाढ होत आहे. ४५ रुपये किलोवर असलेला दर आता ६० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले असून, दसरा-दिवाळी या वर्षातील सर्वात मोठ्या सणांची तयारी हळूहळू घराघरात सुरू झाली आहे. सांगली परिसरात तर पुरामुळे अगोदरच जनजीवन विस्कळीत झाले असताना, दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या कांदा, लसणाच्या दरात होत असलेली वाढ गृहिणींना चिंतेत टाकणारी आहे.
येथील फळ मार्केटमध्ये कर्नाटकसह नाशिक भागातून कांद्याची आवक होते. या आठवड्यातील आवक लक्षात घेता, शुक्रवारी अवघी ८० टन आवक झाली होती, तर शनिवारी यात वाढ होत ४०० टन कांद्याची आवक झाली आहे.
सरासरी ४ हजार ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. घाऊक बाजारातच कांद्याचे दर वाढल्याने स्वाभाविकपणे ग्राहकांना जादा दराने कांदे खरेदी करावे लागत आहेत. फळ मार्केटमध्ये होणाऱ्या सौद्यांमध्ये सरासरी साडेतीन हजार ते ५ हजार पोत्यांची आवक होत असते. मात्र, आवक नसल्याने दरातील वाढ कायम आहे.
कर्नाटकात कांदा उत्पादन होत असलेल्या काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे तर काही भागात अतिवृष्टीने कांदा पीक वाया गेले आहे. त्याचा थेट परिणाम आवकेवर झाला आहे. कर्नाटकातून होत असलेली आवक जवळपास ७० टक्क्यांनी घटली आहे.
दिवाळीपर्यंत दरवाढ कायम?
एका सौद्याला ८० टन, तर एकदा ४०० टन अशी आवक कमी जास्त होत असल्याने त्याचा परिणाम कांदा दरावर होणार आहे. येत्या महिन्याभरात तरी दरातील वाढ कायम राहण्याची शक्यता व्यापारीवर्गाने व्यक्त केली आहे. तरीही आवक वाढल्यास सर्वसामान्यांच्या आवाक्यात दर येतील, असा आशावादही व्यक्त केला आहे.
आवक कमी-जास्त होत असल्यानेच दर वाढत आहेत. सध्या ४० ते ४५ रुपयांपर्यंत घाऊक दर आहेत. आवक वाढली तरच कांदा दरात घट जाणवणार आहे.
राजेश पोपटाणी, अध्यक्ष, कांदा-बटाटा व्यापारी असोसिएशन.