बांगलादेशी दलाल व तरुणी सुटलेच कसे?
By admin | Published: July 14, 2015 12:39 AM2015-07-14T00:39:41+5:302015-07-14T00:39:41+5:30
तानाजी सावंत : आंदोलनाचा इशारा
सांगली : काही दिवसांपूर्वी सांगलीच्या वेश्यावस्तीतून एक बांगलादेशी अल्पवयीन मुलगी व परप्रांतीय दलाल पोलिसांच्या हाती लागले होते, पण ते गायब झाले. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, परप्रांतीयांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत आहे. स्थानिक तरुणांना हत्यारे पुरविणे, महिलांची छेड काढणे, बलात्कार, खून व मारामारीच्या घटनांमध्ये परप्रांतीयांची नावे अनेकदा आली आहेत. तरीही पोलीस त्यांच्याबाबतीत गंभीर नाहीत. परप्रांतीय तरुण व कामगारांच्या नोंदी प्रत्येक पोलीस ठाण्यात करण्याची गरज असतानाही, त्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. परप्रांतीयांना कोणत्या कारणासाठी अभय दिले जात आहे, याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे.
सांगलीच्या वेश्यावस्तीत आलेल्या एका परप्रांतीय दलालास पकडून त्याच्याकडील एका १२ वर्षाच्या बांगलादेशी मुलीची सुटका केली होती. दलालास चोप देऊन विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पण पोलिसांनी सोडल्यामुळे त्याने पलायन केले. या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रमुखांकडे करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)