उत्सवात गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता?, कालीचरण महाराजांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 10:57 AM2022-08-19T10:57:20+5:302022-08-19T10:58:09+5:30

आपण गणपतीचे कशापद्धतीने पूजन करतो, त्याला कसा निरोप देतो याचा विचार करायला हवा.

How do you play movie songs in front of Ganpati in the festival, asked Kalicharan Maharaj | उत्सवात गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता?, कालीचरण महाराजांचा सवाल

उत्सवात गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता?, कालीचरण महाराजांचा सवाल

Next

सांगली : घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य सन्मान राखता, मग गणपतीचा किती राखायला हवा? चित्रपटाची गाणी लावणे, त्यावर बीभत्स नृत्य करणे हे प्रकार बंद व्हायला हवेत, असे मत कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले.

सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने प्रथमच सांगलीत कावड यात्रा काढण्यात आली. कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडली. यावेळी ते म्हणाले की, गणपती उत्सव जवळ आला आहे. आपण गणपतीचे कशापद्धतीने पूजन करतो, त्याला कसा निरोप देतो याचा विचार करायला हवा. घरी आलेल्या पाहुण्याला आपण सन्मानाने निरोप देतो, पण गणपतीला अनेकदा तेवढा सन्मान का मिळत नाही? त्याच्यासमोर चित्रपटाची गाणी लावली जातात. विसर्जन मिरवणुकीत तशीच गाणी व नृत्य सादर केले जातात. या गोष्टी अयोग्य आहेत. मनातून परमेश्वर मानला पाहिजे. मनाने तो मानला नाही, तर राक्षसी प्रवृत्तीचा वास शरीरात होतो. त्यामुळे तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यानेही माणसाला परमेश्वराच्या कृपादृष्टीचा लाभ होतो.

सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून यात्रेस सुरुवात झाली. कालीचरण महाराज यांच्याहस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कावड पूजन करण्यात आले. कावड पूजनानंतर कालीचरण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी शिवतांडव सादर केले. गोंधळ कार्यक्रमही पार पडला. भर पावसात तरुणाईने गोंधळाच्या कार्यक्रमात ठेका धरला. शिवतीर्थ ते हरिपूर येथील संगमेश्वरपर्यंत यात्रा काढण्यात आली. कृष्णा नदीसह शिवनेरी, राजगड, रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, अजिंक्यतारा, प्रतापगड अशा ७ गडांचे व गंगा, नर्मदा, भीमा, नीरा, कृष्णा, कोयना, सावित्री आदी ११ नद्यांचे पाणी आणून कावड यात्रा काढण्यात आली. संगमेश्वर येथे त्याचे विसर्जन करण्यात आले.

प्रतिष्ठानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहरलाल सारडा, लक्ष्मण नवलाई आदी उपस्थित होते.

Web Title: How do you play movie songs in front of Ganpati in the festival, asked Kalicharan Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.