राग ही भावना कशी हाताळतो, यावर समाज स्वास्थ्य अवलंबून - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:16 PM2019-01-16T23:16:22+5:302019-01-16T23:49:08+5:30
‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना
सातारा : ‘समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे, ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना आपण कशी हाताळतो? त्यावरून आपल्या स्वत:चे भावनिक आरोग्य नातेसंबंध आणि एकुणात समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते,’ असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.
डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘सध्या समाजात बऱ्याच सणांचे टोकाचे उत्सवीकरण आणि बाजारीकरण केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संक्रांतीसारख्या सणाच्या मागची मानवी नाते संबंध टिकवण्याची जी प्रेरणा आहे, त्याला उजाळा देण्याचा ‘लोकमत’चा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यानिमित्ताने निवडलेला विषय राग आणि इतर नकारात्मक भावनेचे मानवी मनावर आणि एकूण समाजावर होणारे परिणाम हा एकदम महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषय आहे.’
सध्याच्या समाजातील वाढती जातीय आणि धार्मिक तेढ यामागचे मूळचे कारण हे रागाची भावनांचं आहे, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही.
समाजात वाढणारा हिंसाचार आणि आत्महत्या यामागे देखील रंगाच्या सारख्या नकारात्मक भावना असतात. राग येणे ही एक अगदी नैसर्गिक भावना आहे, ती पूर्णपणे टाळणे कुणालाही शक्य नाही; पण ती भावना आपण कशी हाताळतो? त्यावरून आपल्या स्वत:चे भावनिक आरोग्य नातेसंबंध आणि एकुणात समाजाचे स्वास्थ्य अवलंबून असते. आपल्याला राग आलेला आहे, हे पहिल्यांदा स्वत:ला जाणवणे, तो योग्य शब्दात व्यक्त करणे, दुसºयाला आलेला राग ओळखता येणे आणि तो हाताळता येणे, ही चार कौशल्ये रागाच्या नियोजनाच्या साठी खूप महत्त्वाची आहेत. तिळगूळ घ्या, गोड बोला, हे वाक्य म्हणायला खूप सोपे असले तरी आपल्या मनातील रागाच्या आणि टोकाच्या नकारार्थी भावना बाजूला ठेवून तसे वागणे अजिबात सोपे नाही. संक्रांतीच्या निमित्त एकमेकांना तिळगूळ घ्या, गोड बोला म्हणताना ते केवळ उपचार न राहाता जर वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जर करू लागलो तर किती तरी वाईट गोष्टी आपल्याला टाळता येतील.
रागमुक्त समाजाचे चित्र आज जरी अशक्य वाटत असले तरी देखील हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, यावरच मानव जातीचे भवितव्य अवलंबून आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही !
हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लावणारा संक्रांतीचा सण तसा संक्रमणाचा काळ आहे. या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे तिळाची वडी. आई डॉ. शैला दाभोलकर आणि मामी अनघा तेंडोलकर यांनी केलेली तिळाची वडी मला स्वत:ला खूप आवडते. आमच्या घरी आम्ही दरवर्षी न चुकता तिळाच्या वड्या करतो.