घोगाव पाणी योजनेचा पांढरा हत्ती पोसणार कसा?

By admin | Published: February 28, 2017 11:49 PM2017-02-28T23:49:23+5:302017-02-28T23:49:23+5:30

विटा नगरपालिकेसमोर आव्हान : उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट : पाणीपट्टीत वाढ आवश्यक

How to feed the white elephant of Ghogav ​​water scheme? | घोगाव पाणी योजनेचा पांढरा हत्ती पोसणार कसा?

घोगाव पाणी योजनेचा पांढरा हत्ती पोसणार कसा?

Next



दिलीप मोहिते ल्ल विटा
सांगली जिल्ह्यातील सुवर्णनगरी म्हणून परिचित असलेल्या विटा शहरात काही वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये पदार्थ घेतल्याशिवाय ग्लासभरही पाणी मिळत नव्हते. अशी परिस्थिती असलेल्या या शहरात १९९८ पासून कृष्णा घोगाव नळपाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले असले तरी, सध्या या योजनेचा खर्च उत्पन्नापेक्षा दुप्पट होत आहे.
त्यामुळे पालिका प्रशासनाला वार्षिक सुमारे २ कोटी १० लाख रूपये नुकसान सहन करून ही योजना सुरू ठेवावी लागत असल्याने, आगामी काळात या कृष्णा घोगाव नळपाणी पुरवठा योजनेचा पांढरा हत्ती पोसायचा कसा? असा प्रश्न पालिका कारभाऱ्यांसह प्रशासनाला पडला आहे. विटा शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी १९९८ ला शहरापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या घोगाव येथील कृष्णा नदीतून पाणी योजना सुरू करण्यात आली. आळसंद तलावाजवळ पाणी फिल्टर यंत्रणा उभारून तेथून स्वच्छ व निर्जंतुक पाणी विटेकरांना देण्यात येऊ लागले आहे. शहरात सध्या अर्धा इंची घरगुती नळ कनेक्शनची संख्या ८ हजार ८९७ असून, त्यांना वार्षिक प्रत्येकी दोन हजार रुपये पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. तसेच वाणिज्य, विशेष प्रवर्ग, पाऊण इंची घरगुती, वाणिज्य व विशेष प्रवर्ग नळ कनेक्शन्सची संख्या अवघी २१३ इतकी आहे.
त्यामुळे पालिका प्रशासनाकडे पाणीपट्टीच्या रूपाने वार्षिक १ कोटी ८८ लाख ५७ हजार १०० रूपये रक्कम जमा होत आहे. परंतु, या योजनेचा वार्षिक खर्च पाहता, तो उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. नदीतून पाणी उचलण्यासाठी २२ लाख २९ हजार ८२१, घोगाव व आळसंद येथील पंपगृहाचे वीज बिल २ कोटी ६१ लाख ४ हजार ३९० रूपये, देखभाल, दुरूस्तीसाठी २५ लाख ९६ हजार ९७६ रूपये, पाणी शुध्दीकरणासाठी १० लाख ८८ हजार ९४५ रूपये, कर्मचारी पगारावर ५० लाख ७४ हजार २३ रूपये, ट्रान्स्फॉर्मर दुरूस्ती व यंत्रसामग्री खरेदीसाठी ५ लाख ५७ हजार ५६३, किरकोळ खर्च ८ लाख ७० हजार ५६ व पाईप खरेदीसाठी १ कोटी २८ लाख ३ हजार ७५६ रूपये, असा सुमारे ३ कोटी ९८ लाख २५ हजार ५३० रूपये वार्षिक खर्च या योजनेवर होत आहे.
त्यामुळे पाणीपट्टीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम पाणी योजनेवर खर्च होत आहे. परिणामी, विट्याची घोगाव पाणी योजना स्वावलंबी नसल्याने, शासनाने ही योजना स्वयंपूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून रखडलेली पाणीपट्टी दरातील वाढ करण्याशिवाय पालिका प्रशासनाला गत्यंतरच राहिले नाही.
दरम्यान, पाणीपट्टी दरात पाचशे ते हजाराची वाढ केली तरी उत्पन्न काहीअंशी वाढेल. पण ही योजना स्वावलंबी होण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आगामी काळात विटा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव पाणी योजनेचा पांढरा हत्ती पोसण्याचे आव्हानच विटा नगरपालिकेसमोर आता उभे राहिले आहे.

Web Title: How to feed the white elephant of Ghogav ​​water scheme?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.