विस्कटली ‘गट्टी’ तर कशी वाजणार ‘शिट्टी’
By admin | Published: May 23, 2017 11:28 PM2017-05-23T23:28:36+5:302017-05-23T23:28:36+5:30
विस्कटली ‘गट्टी’ तर कशी वाजणार ‘शिट्टी’
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील शेट्टी अन् खोत यांची ‘गट्टी’ साऱ्यांनाच परिचित आहे. मात्र, सध्या या दोघांमध्ये दरी पडलेली दिसून येते. सदाभाऊंचा वाढलेला ‘भाव’ शेट्टींना अस्वस्थ करतोय. तर भाऊंना ‘कमळ’ खुणावतंय. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील स्वाभिमानी कार्यकर्तेही संभ्रमात पडलेत. एकाच संघटनेत असूनही ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी येथील कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे.
स्वाभिमानीत खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असणारा सुप्त संघर्ष आता बाहेर पडू लागलाय. दोघेही एकमेकांवर कुरघोडी अथवा टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. सोमवारी (दि. २२) पुणे येथून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीची आत्मक्लेश पदयात्रा सुरू झालीय. पण त्याच्या पोस्टरवरून सदाभाऊंचा फोटो अगोदरच गायब झालाय. त्यामुळे शेट्टी अन् खोत यांची गट्टी आता फुटणार अशी चर्चा आहे. सदाभाऊ खोत यांना भाजपचं कमळ खुणावतंय, असे खात्रीशीर बोललं. जातंय. असं झालंच तर सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानी कार्यकर्ता शेट्टींनी हातात दिलेली स्वाभिमानीची शिट्टी टाकून देणार नाही, अशी आजची स्थिती आहे. मात्र, सदाभाऊंचा हातही रिकामाच राहील, असेही नाही.
खरं तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत घोंगावणारे स्वाभिमानीचे वारे सातारा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने घुसले ते सन २०१४ मध्ये. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून संघटनेने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. पण पोलिसांनी परवानगी नाकारली आणि मोर्चेकरी बैलबाजारापर्यंत पोहोचले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. आणि पोलिसांनी आंदोलकांना महामार्गालगतच्या पाचवड फाटा येथे जागा उपलब्ध करून दिली. अनेक दिवस चाललेल्या या उपोषणाच्या यशस्वीतेसाठी कऱ्हाड तालुक्यातील गावागावांतून दररोज हजारो कार्यकर्त्यांसाठी पिठलं-भाकरीचं जेवण यायचं. त्यामुळे हे आंदोलन जणू कऱ्हाडकरांचं बनलं होतं. पाचवड फाट्यावरचे उपोषण संपले. पण संयम सुटलेल्या कार्यकर्त्यांनी स्वत:च आंदोलन हातात घेतले. ‘खळखट्याकऽऽऽ’ सुरू झाले. अनेक वाहने पेटली. जनजीवन सुरळीत येण्यासाठी पुरा आठवडा सरला. त्यामुळे स्वाभिमानीची आक्रमकता कऱ्हाड तालुक्याला चांगलीच भावली.
..तर प्रत्येकाच्या वाटणीला एक जिल्हाध्यक्ष
साताऱ्यात स्वाभिमानीचे दोन जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हा मोठा असल्याने जबाबदारी विभागल्याचे सांगितले जाते. संजय भगत व अर्जुन साळुंखे ही जबाबदारी सध्या सांभाळत आहेत. पण यातील एक जिल्हाध्यक्ष सदाभाऊंचा पाहुणा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे संघटनेत दरी पडली तरी प्रत्येकाच्या वाटणीला एक जिल्हाध्यक्ष येईल, हे नक्की !
कऱ्हाडात शेट्टीच भक्कम...
कऱ्हाड तालुक्यात स्वाभिमानीचे जाळे तसे तुलनेने मजबूत आहे. दक्षिणचे अध्यक्षपद देवानंद पाटील तर उत्तरचे अध्यक्षपद सचिन नलवडे सांभाळत आहेत. शहराध्यक्षपदाची जबाबदारी धनाजी शिंदे पार पाडत आहेत. हे तिघेही खासदार शेट्टी समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यात खोतांच्या हाताला फारशे काही लागेल, असे वाटत नाही.
जिल्हाध्यक्षांची होतेय कसरत
शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव शिंदे यांना काही महिन्यांपूर्वी बढती देऊन त्यांना स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले गेले आहे. दोघांच्या वादात ही जबाबदारी सांभाळताना त्यांना कसरत करावी लागत आहे. पण निर्णय घ्यायचीच वेळ आली. तर ते काय करतील, हे आज सांगणे कठीण.
आधी पंजाबराव नंतर घोरपडेही गेले...
गत विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी आलेल्या मनोज घोरपडेंच्या हातात स्वाभिमानीने शिट्टी दिली. मात्र, दक्षिणेतून आपण प्रबळ दावेदार असतानाही संघटनेतील नेत्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न न केल्याचा आरोप करीत दुखावलेल्या पंजाबराव पाटलांनी संघटनेपासून फारकत घेतली. तर दुसरीकडे स्वाभिमानीची शिट्टी हातात घेतलेल्या घोरपडेंमुळे उत्तरेत संघटनेची ताकद वाढेल, ही आशा काही महिन्यांतच फोल ठरली. कारण मनोजदादांनी निवडणुकीनंतर काही महिन्यांतच भाजपच कमळ हातात घेणं पसंद केलं.