बंडखोरांवर कारवाई करायची तरी कशी? : महायुतीच्या नेत्यांसमोर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:51 PM2019-10-14T23:51:22+5:302019-10-14T23:52:09+5:30
आठ मतदारसंघांपैकी शिराळा, इस्लामपूर व जत या तीन ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाली. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात सम्राट महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक पुन्हा मैदानात आहेत.
शीतल पाटील ।
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. त्यात महायुतीत तीन ठिकाणी बंडखोरी झाल्याने भाजप-शिवसेना नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. राज्यपातळीवरील नेत्यांनी त्यांचा बंदोबस्त करण्याचा इशाराही दिला, पण आतापर्यंत तरी या बंडखोरांवर कोणतीच कारवाई झालेली नाही. उलट बंडखोरांनीच पक्षाचे राजीनामे देत पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.
आठ मतदारसंघांपैकी शिराळा, इस्लामपूर व जत या तीन ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाली. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात सम्राट महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक पुन्हा मैदानात आहेत. या तिरंगी लढतीमुळे शिराळ्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. महाडिक गटाने गेल्या काही वर्षांपासून भाजपशी जवळीक साधली होती. त्यांचा शिराळा मतदारसंघात स्वतंत्र गटही आहे, पण दिवंगत नानासाहेब महाडिक, सम्राट व राहुल महाडिक यांनी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. यंदाच्या निवडणुकीत सम्राट यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण भाजपने पुन्हा शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली. ते सदस्य नसल्याने त्यांच्यावर कारवाई कशी करायची, असा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे.
महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. वाळव्याचे गौरव नायकवडी यांनी शेवटच्याक्षणी शिवबंधन बांधत उमेदवारी मिळविली. त्यांच्या पाठीशी भाजपची नेतेमंडळी उभी राहिली, पण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मात्र वेगळी वाट धरली. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये उभी फूट पडली. काही नेते नायकवडींकडे, तर काहीजण पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाले. उमेदवारी अर्ज माघारीपूर्वी पाटील यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. भाजपच्या तालुका, शहर, महिला कार्यकारिणीने पाटील यांना पाठिंबा दिला. भाजपच्या नेत्यांना जाग आली आणि त्यांनी तालुका कार्यकारिणी बरखास्त करून टाकली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. पाटील भाजपमध्ये कुठल्याच पदावर नसल्याने त्यांच्यावरही कारवाईची अडचण आहे.
जत विधानसभा मतदारसंघातही भाजपचे आ. विलासराव जगताप यांच्याविरोधात जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसने विक्रम सावंत यांना उमेदवारी दिली आहे. बंडखोर आरळी यांच्यामागे भाजपची तालुका कार्यकारिणी उभी आहे. आरळी यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र तालुका कार्यकारिणीने राजीनामे दिले आहेत. आरळी यांच्यावर पक्षाने आजअखेर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे. सांगलीतही भाजपच्या सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात शिवसेनेचे शेखर माने यांनी बंडखोरी केली आहे; पण माने शिवसेनेत कोणत्याच पदावर नसल्याने त्यांच्यावर कारवाईची अडचण निर्माण झाली आहे.
वेगवेगळा : न्याय का?
इस्लामपूर मतदारसंघात भाजप बंडखोर निशिकांत पाटील यांच्या मागे तालुका, शहर व महिला कार्यकारिणीतील सदस्य उभे आहेत. पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी बराच प्रयत्न झाला; पण त्यांची बंडखोरी कायम राहिल्यानंतर भाजपने तातडीने कार्यकारिणी बरखास्त केली. पण हाच न्याय जत मतदारसंघात मात्र लावला नाही. तेथील कार्यकारिणीतील अनेक सदस्य बंडखोर डॉ. आरळींच्या मागे आहेत. जतच्या कार्यकारिणीवर मात्र अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे दोन मतदारसंघात वेगवेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.