३५ फूट पुतळा ८ महिन्यांत कसा तयार होईल?; ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर यांनी उपस्थिती केली वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 09:54 AM2024-08-30T09:54:56+5:302024-08-30T09:55:20+5:30

मी आतापर्यंत ब्रांझचे हजारो पुतळे तयार केले. मात्र, एकाही पुतळ्याचे वादळवारा किंवा अन्य कारणांनी नुकसान झालेले नाही, असेही गुजर यांनी सांगितले.

How to build a 35 foot statue in 8 months Senior sculptor Vijay Gujars question | ३५ फूट पुतळा ८ महिन्यांत कसा तयार होईल?; ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर यांनी उपस्थिती केली वेगळीच शंका

३५ फूट पुतळा ८ महिन्यांत कसा तयार होईल?; ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर यांनी उपस्थिती केली वेगळीच शंका

सदानंद औंधे, लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज (जि. सांगली) : चांगला मजबूत पस्तीस फूट उंचीचा पुतळा तयार करण्यासाठी किमान दोन वर्षे लागतात. शिवरायांचा पुतळा घाईगडबडीत आठ महिन्यांत तयार करण्यात आला. पुतळ्याचे तुकडे झाल्याने यासाठी वापरण्यात आलेला धातू व त्याच्या जाडीबाबत संशय असल्याची भावना मिरजेतील ज्येष्ठ शिल्पकार विजय गुजर यांनी व्यक्त केली. मी आतापर्यंत ब्रांझचे हजारो पुतळे तयार केले. मात्र, एकाही पुतळ्याचे वादळवारा किंवा अन्य कारणांनी नुकसान झालेले नाही, असेही गुजर यांनी सांगितले.

शुद्ध ब्राँझ वापरले की नाही शंकाच
- गुजर म्हणाले, ब्रांझ धातू अतिशय मजबूत असल्यानेच या धातूचे पुतळे तयार करण्यात येतात. ब्रांझचा पुतळा तयार करताना ८५ टक्के तांबे, पाच टक्के सिलिकॉन, पाच टक्के लीड व पाच टक्के निकेल, असे मिश्रण असते.
- या मिश्रणातून तयार झालेल्या पुतळ्यावर हजारो वर्षे कशाचाही परिणाम होत नाही. पुतळ्याच्या उंचीवर त्याची जाडी व त्याचा आतून आधार अवलंबून असतो. पुतळ्यासाठी शुद्ध ब्राँझ वापरले की नाही? याचीही शंका आहे.
- समुद्रकिनारी पुतळा बसवताना तेथील वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून पुतळ्याला मजबूत आधार द्यावा लागतो.
- मात्र, मालवण येथील पुतळा कमीत कमी खर्चात काम करण्याच्या अट्टहासामुळे कोसळला असावा.
- अननुभवी शिल्पकारावर असे मोठे काम सोपवणे ही मोठी चूक होती. 

गुजर यांनी साकारलेले पुतळे देश-विदेशांत
- विजय गुजर यांनी तयार केलेला राणी चेन्नम्माचा अश्वारूढ पुतळा संसद भवन आवारात उभारला आहे. महाड येथील डॉ. आंबेडकर स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे जिजाऊंचा पुतळा महाराष्ट्र शासनाने गुजर यांच्याकडून तयार करून घेतला आहे.
- अभिनेता चार्ली चॅप्लिन यांचा ब्राँझचा पुतळा लंडनमधील चौकाची शोभा वाढवीत आहे. महात्मा बसवेश्वर यांचा अर्ध पुतळा लंडन येथे विराजमान आहे.
- जॉन होगल या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचा गुजर यांनी बनविलेला पुतळा स्वित्झर्लंडच्या झुरीच क्लबमध्ये आहे. अमेरिकेतही गुजर यांनी बनविलेला राणी चेन्नम्मा यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे.

Web Title: How to build a 35 foot statue in 8 months Senior sculptor Vijay Gujars question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.