आंबे कसे ओळखाल? नैसर्गिक की कृत्रिम रसायनांनी पिकवलेले.. जाणून घ्या
By अशोक डोंबाळे | Published: May 6, 2024 06:20 PM2024-05-06T18:20:19+5:302024-05-06T18:24:09+5:30
बाजारात हापूस, केसर, गावरानसह विविध प्रजातींचे आंबे दाखल
सांगली : यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यांपासूनच फळांचा राजा आंबाबाजारात दाखल झाला. आंबा पाहून खवय्यांमध्ये खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली. पण, हे आंबे नैसर्गिकरीत्या पिकलेले होते का, हासुद्धा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. काही ग्राहक नवीन आंबा बाजारात आला म्हणून कुठलीही चौकशी न करता खरेदी करत आहेत. मग नैसर्गिकरीत्या पिकलेला व रसायनांनी पिकवलेला आंबा ओळखायचा कसा, हेच जाणून घेण्याची गरज आहे.
कोणती फळे खाण्यास योग्य
जैवरासायनिक प्रक्रिया झालेली आंब्यांसह इतर फळे खाण्यास योग्य असतात. यात कच्चे फळ ८ ते १० प्रक्रियेतून जात असते. यात रंग येणे, स्वाद निर्माण होणे, साखरेचे प्रमाण वाढणे, आम्लता कमी होणे, मऊपणा येणे अशी लक्षणे आंबे व इतर फळांमध्ये दिसल्यास ही फळे खाण्यायोग्य असतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे टाळावीत.
रसायनांनी पिकवलेले आंबे कसे ओळखाल?
कॅल्शिअम कार्बाइडने पिकवलेली फळे घट्ट व आकर्षक रंगाची असली तरी आंब्याच्या विशिष्ट जातीचा गंध, सुवास अजिबात येत नाही. फळांमध्ये योग्य ती पिकविण्याची प्रक्रिया न झाल्याने ती चवीला आंबट किंवा चवहीन असतात. पूर्णत: पिकलेले वाटणारे, पण तेवढेच हे आंबे घट्ट असतात, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले.
कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे घातक
रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे खाल्ल्यास आतड्यांचे गंभीर आजार, पोटातील अल्सर, डोकेदुखी, चक्कर, विस्मरण, झोप उडणे यांसारखे आजार व विकार होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
कसे ओळखाल आंबे?
इथिलीन किंवा इथिलीन वायूशी निगडित रसायनांमुळे पिकणारी फळे थोडी मऊ असतात. तसेच या फळांना विशिष्ट सुवास प्राप्त झालेला असतो. फळे कापल्यानंतर गर पिवळा किंवा केशरी रंगाचा असतो.
बाजारातील आंब्याचे दर काय? (डझन)
- हापूस ३०० ते ४०० रुपये
- केसर १५० ते १८० रुपये
- तोतापुरी ८० ते १०० रुपये