पदांसाठी लाचार कसे होता?
By admin | Published: March 16, 2016 08:28 AM2016-03-16T08:28:03+5:302016-03-16T08:30:13+5:30
अण्णा डांगे : महादेव जानकरांच्या भूमिकेवर टीकास्त्र
सांगली : आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याच पायाला पुन्हा लोणी लावण्याचे काम जिल्ह्यातील स्वाभिमानी म्हणवणारे नेते करीत आहेत. एखाद्या समाजाचे नेतृत्व करताना पदांसाठी हे लोक लाचार कसे होतात? अशा पदांना लाथ मारून स्वाभिमानाने राजकारण करता आले पाहिजे, अशी टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी नेते अण्णा डांगे यांनी महादेव जानकर यांचे नाव न घेता केली.
धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. याच राजकारणाचा धागा पकडत डांगे म्हणाले की, महाराष्ट्रात हे कसले राजकारण सुरू आहे? मंत्रिपदासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. एका समाजाचे नेतृत्व करून मतांचे राजकारण करायचे चालू आहे. समाजासाठी अशा पदांना लाथ मारायला हवी. एकूणच महाराष्ट्रातील राजकारणात जे काही चालले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे निर्णय चुकीचेच असले, तरी विरोधकांचा अकांडतांडवही काही बरोबर नाही. कॉँग्रेसनेही त्यांच्या सत्ताकाळात त्याच गोष्टी केल्या. विद्यमान मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या कारकीर्दीत असेच निर्णय घेतले होते. त्यामुळे दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा एकत्रित येऊन प्रश्न सोडविला पाहिजे.
यापूर्वीही १९७२ च्या दुष्काळावेळी आम्ही आंदोलने केली होती. रस्त्यावर उतरून किंवा अन्य मार्गाने आंदोलने करताना सभागृहातील चर्चा होणे महत्त्वाचे असते.
विधिमंडळातील चर्चा बंद करण्यापर्यंतचे राजकारण कोणाच्याही हिताचे नाही. त्यामुळे चर्चा होऊन निर्णय घेतले गेले पाहिजेत. मागील अधिवेशनात ज्याबद्दल सरकारने आश्वासने दिली होती, त्याची उत्तरे या अधिवेशनात त्यांना देणे भाग होते. मात्र चर्चाच बंद होत असतील, तर प्रश्न अणि उत्तरांचा संबंधच उरत नाही. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हाच अपेक्षा सोडल्या
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतरच अपेक्षा सोडल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत पक्षाने माझ्याकडे कोणतेही काम दिलेले नाही. पदाची किंवा अन्य कोणत्याही सन्मानाची अपेक्षाही आता सोडून दिलेली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळवून दिल्यास सर्व अपेक्षा पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल, असे मत डांगे यांनी व्यक्त केले.