सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार?, संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल

By अशोक डोंबाळे | Published: January 6, 2024 06:36 PM2024-01-06T18:36:57+5:302024-01-06T18:38:43+5:30

मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

How will the government give the Maratha reservation canceled by the Supreme Court says Sambhaji Raje Chhatrapati | सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार?, संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार?, संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकते, या बाबतीत अनेक वेळा मी भूमिका मांडली आहे. सध्या सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे; पण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे आता राज्य सरकार मराठा समाजाला कसे आरक्षण देणार आहे?, असा सवाल स्वराज्य संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.

सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी आर्ट सर्कल प्रस्तुत ‘युवारंग २०२४’च्या उद्घाटनप्रसंगी संभाजीराजे छत्रपती बोलत होते. आर्ट सर्कलचे अध्यक्ष सर्वज्ञ मोरे यांनी त्यांची मुलाखत घेतली.

संभाजीराजे म्हणाले, सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकदा मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले आहे. पूर्वी रद्द झाल्यानंतर पुन्हा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला तर तिथे ते टिकणार आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. तसेच सध्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेच स्वागत करतो; पण मराठा समाजाला कसे आरक्षण देणार आहे, ते सरकारने जाहीर करण्याची गरज आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मनातील शंका संपणार आहेत. तसेच शेवटी भावना आणि न्यायिक याचा समतोल साधून गरीब मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं, ही माझी अपेक्षाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमचा फोकस विधानसभा

सध्या आमच्या स्वराज्य संघटनेचा फोकस विधानसभा निवडणुकांवर आहे. लोकसभा निवडणुकांबाबत सध्या तरी कोणताही निर्णय घेतला नाही. अजून वेळ आहे; पण सध्या तरी स्वराज्य संघटनेचे लक्ष विधानसभा निवडणूकच असणार आहे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Web Title: How will the government give the Maratha reservation canceled by the Supreme Court says Sambhaji Raje Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.