वंदेभारत एक्स्प्रेसचा वाद; सांगलीवर पुन्हा अन्याय, कोल्हापूरला थांबा
By अविनाश कोळी | Published: September 12, 2024 04:15 PM2024-09-12T16:15:21+5:302024-09-12T16:15:45+5:30
खासदारांसह विविध संघटनांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र
सांगली : हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला कोल्हापुरातून वळसा घालून मार्ग दिल्याने कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता. आता कोल्हापूरच्या खासदारांनी तसेच सांगलीच्या संघटनांनीही विरोध दर्शवित दोन स्वतंत्र वंदेभारत देण्याची मागणी केली आहे. एकीकडे कोल्हापूरला हुबळीच्या गाडीचा थांबा नको असताना दिला गेला, तर सांगलीकरांनी मागणी करुनही या गाडीचा तीन दिवसांचा सांगली स्थानकावरील थांबा रद्द केला आहे.
रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकला जोडणारी ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ मंजूर केली आहे. हुबळी ते पुणे (गाडी क्र. २०६६९) व पुणे ते हुबळी (क्र. २०६७०) या दोन गाड्या मिरज, सांगली, सातारामार्गे मंजूर केल्या होत्या. नंतर त्यात कोल्हापूरलाही थांबा दिल्याचे नमूद करण्यात आले. तीन दिवस कोल्हापूरमार्गे व तीन दिवस थेट मिरज, सातारामार्गे गाडी धावेल, असे म्हटले आहे.
पुणे ते हुबळी या मार्गावरुन जाताना कोल्हापूरचे स्थानक ४८.५ कि. मी. दूर आहे. आठ तासांच्या कालावधित धावणारी ही गाडी कोल्हापूरमार्गे धावताना १० तास वेळ खाणार आहे. त्यामुळेच कर्नाटक व महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी व संघटनांनी त्यास विरोध केला आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर स्वतंत्र वंदे भारत मंजूर आहे. तरीही कोल्हापूरचा यात समावेश करुन मंजूर गाडी रद्दचा डाव असल्याचा संशय प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे.
सांगलीवर पुन्हा अन्याय
वंदेभारतला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा दिल्याची माहिती जेव्हा भाजपच्या नेत्यांनी दिली तेव्हा सांगलीकर प्रवाशांनी आनंद साजरा केला. पण, अचानक गुरुवारी सांगलीचा तीन दिवसांच्या फेऱ्यात थांबा रद्द केला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर पुन्हा रेल्वे प्रशासनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
यांनी केला विरोध
हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सांगली, मिरज मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन, नागरिक जागृती मंच आदींनी रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांना पत्र पाठवून हुबळीची गाडी कोल्हापूरमार्गे न वळविता मंजूर असलेली कोल्हापूर ते मुंबई वंदेभारत सुरु करावी, अशी मागणी केली आहे.