मिरजेत औषध गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:25 AM2021-04-12T04:25:03+5:302021-04-12T04:25:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरज रेल्वे स्थानक परिसरातील औषध गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे औषधी साहित्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज रेल्वे स्थानक परिसरातील औषध गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे औषधी साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय असून, महापालिका अग्निशामक दलाने आग आटाेक्यात आणली.
मिरजेत स्टेशन रोडजवळ प्रताप कॉलनीतील पॉप्युलर मेडिकल एजन्सीच्या गोदामाला शनिवारी रात्री साडेदहा वाजता शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत संगणक, इन्व्हर्टर, लाकडी टेबल, पंख्यांसह लाखो रुपयांच्या औषधांचा साठा भस्मसात झाला. औषध दुकानचालक राहुल धनवडे यांनी कोट्यवधी रुपयांची औषधे जळाल्याचा दावा केला आहे. मिरजेतील लक्ष्मी मार्केट येथे धनवडे यांच्या मालकीचे औषध दुकान आहे. प्रताप कॉलनीत त्यांच्या घराजवळच एका गोदामात कोट्यवधींचा औषधसाठा ठेवण्यात आला होता. शनिवारी रात्री गोदामात अचानक शॉर्टसर्किट होऊन इन्व्हर्टरने पेट घेतल्याने लाकडी साहित्याला आग लागून ठिणग्या पडल्याने औषधी साठ्यानेही पेट घेतला.
गोदामातील खिडक्यांमधून आग व धुराचे लोळ बाहेर येऊ लागल्यानंतर अग्निशमन विभागाने त्याठिकाणी धाव घेतली. अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, सचिन जगताप, जावेद मुश्रीफ, फायरमन सागर गायकवाड, विशाल रसाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर गोदामाला लागलेली आग आटोक्यात आणली.