‘ती’चा गणपती उपक्रमांतर्गत कार्यशाळेस उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:04 AM2017-08-24T00:04:51+5:302017-08-24T00:04:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व कलाविश्वाला वेगळा आयाम देणारा गणेशोत्सव लवकरच सुरु होत आहे. ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’ व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बुधवारी शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीपप्रज्ज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर टाटा टी गोल्डचे प्रकाश साळुंखे-पाटील आणि प्रशिक्षिका स्नेहा चौंधीकर उपस्थित होत्या. सौ. स्नेहा चौंधीकर आणि त्यांच्या सहकाºयांनी महिलांना सहज आणि सोप्या पद्धतीने गणपती कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले. यावेळी चिमुकल्यांनीही मातीशी खेळून गणपती बनविण्याचा हसतखेळत सराव केला. कार्यशाळेतून एका दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या उत्साहाचेही दर्शन झाले.
कार्यशाळेस शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उत्कृष्ट गणेशमूर्ती बनविणाºया सखी आणि बालचमूंना बक्षिसे देण्यात आली. सखी सदस्यांमध्ये प्रथम क्रमांक मनीषा कुमामेकर, द्वितीय पूजा मालू, तृतीय सुजाता शिंदे, चतुर्थ माया शितोळे, पाचवा क्रमांक मेघा पाटील यांना मिळाला. बालचमूमध्ये प्रथम क्रमांक रोहित केरीपाळे, द्वितीय अभिषेक कदम, तृतीय रोजा शेट्टी, चौथा कार्तिक लोहार, पाचवा क्रमांक माधुरी कोळी यांना मिळाला.
गणेशोत्सव फक्त पुरुषांनीच साजरा करावा, असा नियम नाही. त्यामुळे आपल्या ‘ती’ला त्यात मानाचे स्थान देऊया. ‘ती’ला गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा, ‘ती’ला गणरायाची पहिली पूजा करण्याचा मान देऊन, नव्या सामाजिक अभिसरणाच्या मोहिमेला सुरुवात करूया. या विचाराअंतर्गत गणपतीची प्रतिष्ठापना, पाच दिवस आरती, पूजा, महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. गणेशोत्सवामध्ये ‘ती’ला.. स्त्रीला महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमचे आपल्याला सस्नेह निमंत्रण आहे की, आपण सर्वांनी आमच्या ‘ती’चा गणपती मंडळाला भेट द्यावी. (फक्त महिलांनीच नव्हे, तर पुरुषांनीदेखील येऊन दर्शन
घ्यावे).
‘लोकमत भवन’, वसंतदादा औद्योगिक वसाहत, माधवनगर रोड येथे हा ‘ती’चा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या उपक्रमात स्त्रीशक्तीचा जागर विविध क्षेत्रांतील महिलांना सन्मानित करून करण्यात येणार आहे. दररोज विविध क्षेत्रांतील महिलांच्याहस्ते गणेशाची आरतीही होणार आहे.
ढोल-ताशात गणरायाचे आगमन
‘लोकमत’ सखी मंच आणि ‘टाटा टी गोल्ड’तर्फे प्रथम सांगलीमध्ये ‘ती’चा गणपती हे महिला गणेश मंडळ स्थापन करीत आहोत. श्रींच्या आगमनाची भव्यदिव्य अशी मिरवणूक दि. २४ आॅगस्ट रोजी दु.२.०० वाजता घन:श्यामनगरच्या कमानीपासून ‘लोकमत’ भवन, वसंतदादा औद्योगिक वसाहत, माधवनगर रोड येथे होणार आहे. तरी सर्व सखींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.