कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कारात कर्मचाऱ्यांची माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:24 AM2021-05-24T04:24:57+5:302021-05-24T04:24:57+5:30
कडेगाव : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हक्काच्या माणसानाही उपस्थित राहता येत नाही. आप्तस्वकियांकडून खांदा देता येत नाही ...
कडेगाव : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हक्काच्या माणसानाही उपस्थित राहता येत नाही. आप्तस्वकियांकडून खांदा देता येत नाही आणि कुटुंबातील लोकांकडून चिताग्नीसुद्धा देता येत नाही. अशा स्थितीत माणुसकीच्या नात्याने काळजावर दगड ठेवून चिंचणी ग्रामपंचायतीचे कर्मचारी कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.
चिंचणी ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झालेल्या अनेक कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर हणमंतनगर चिंचणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत.
कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देता येत नाही. अशा स्थितीत चिंचणी ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना न होऊ देता पीपीई किट परिधान करून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर येते. मात्र, अशाही परिस्थितीत येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार माने यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी पवार, संतोष पाटील, धनाजी काळे, कृष्णात राठोड, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी दिलीप चव्हाण व दीपक कदम हे अंत्यसंस्कार करीत आहेत. सरपंच मनीषा माने , उपसरपंच दीपक महाडीक व ग्रामपंचायत सदस्य याकामी सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत.
कोट
मन दुःखी होते
चिंचणी ग्रामपंचायतीचे कर्मचारी पूर्ण दक्षता घेऊन अंत्यसंस्कार करीत आहेत. मात्र मन अनेकदा दुःखी होते. कोरोनाने हक्काचे नाते विसरायला भाग पाडले असताना आमचा कर्मचारी जिद्दीने कार्य करीत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार माने यांनी सांगितले.