सांगलीतील शंभरफुटी रस्ता होणार मोकळा-- लोकमत विशेष-बारा कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:05 AM2018-06-10T00:05:46+5:302018-06-10T00:07:05+5:30

सांगलीतील शंभरफुटी रस्ता कित्येक वर्षापासून अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. गॅरेजवाले, हातवाडीवाल्यांच्या अतिक्रमणाने हा रस्ता वाहतुकीसाठी अवघा २५ फूटसुद्धा उपलब्ध राहत नाही

A hundred-fold turnout will be possible - Lokmat special | सांगलीतील शंभरफुटी रस्ता होणार मोकळा-- लोकमत विशेष-बारा कोटींचा आराखडा

सांगलीतील शंभरफुटी रस्ता होणार मोकळा-- लोकमत विशेष-बारा कोटींचा आराखडा

googlenewsNext
ठळक मुद्दे : अतिक्रमणमुक्तीची योजना-शासनाकडे पाठपुरावा सुरू

शीतल पाटील ।
सांगली : सांगलीतील शंभरफुटी रस्ता कित्येक वर्षापासून अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. गॅरेजवाले, हातवाडीवाल्यांच्या अतिक्रमणाने हा रस्ता वाहतुकीसाठी अवघा २५ फूटसुद्धा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे शहराबाहेरील वाहतुकीचा ताण गावठाणातील रस्त्यावर पडतो. पण आता लवकरच शंभरफुटी रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. तब्बल १२ कोटीहून अधिक रुपये खर्चून हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने मदतीचा हात दिला, तर हा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.

विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयापासून कोल्हापूर रस्त्यापर्यंत शंभरफुटी रस्ता हा केवळ नावालाच शंभरफुटी उरला आहे. अनेक गॅरेज मालक, दुकानदारांनी या रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या मध्यभागी वीज आणि टेलिफोनचे लोखंडी खांब धोकादायक स्थितीत उभे आहेत. कचराकुंड्याही रस्त्यात मध्यभागी आहेत. हा रस्ता व्यवस्थित झाल्यास अवजड वाहने, बसेस या मार्गाने वळविल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू केल्यास डॉ. आंबेडकर मार्गावरील बराच ताण कमी होणार आहे.

आतापर्यंत महापालिकेने अनेकदा शंभरफुटी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात सातत्य नसल्याने अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस घट्टच होत गेला आहे. नादुरूस्त वाहने रस्त्यावरच पडून असतात. त्यात ड्रेनेज योजनेसाठी या रस्त्यावर नवीन वाहिनी टाकण्यात आली आहे. त्याची चाचणी पूर्ण न झाल्याने उत्तर बाजूचा रस्ता केवळ खडीकरण करण्यात आला आहे. दक्षिण बाजूला रस्ता डांबरी करून वाहतुकीची जुजबी व्यवस्था महापालिका व वाहतूक शाखेने केली होती. पण दोन्ही बाजूला अतिक्रमण असल्याने या रस्त्यावरून जाणेच मुश्किलीचे ठरत आहे.

आता या रस्त्यावरील अतिक्रमणांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पुढाकाराने या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. गाडगीळ यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने बारा ते साडेबारा कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. शंभरफुटी रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करण्यासोबतच रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक, विश्रामबाग गणपती मंदिर व वीज वितरणजवळील चौकात दोन आयलँड, ठिकठिकाणी गटारी, तीन ठिकाणी चौक सुशोभिकरण, दोन्ही बाजूला फूटपाथ व सोबतच बॅरिकेटस्् लावले जाणार आहेत. बॅरिकेटस् लावल्याने रस्त्यावरील अतिक्रमणांना चाप बसेल. परिणामी रस्त्यावर गॅरेजवाले व हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण होणार नाही. संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल.

विशेष आराखडा : अशा आहेत तरतुदी...
कोल्हापूर रस्ता ते वीज वितरण कार्यालयापर्यंतच्या या शंभरफुटी रस्त्यावर दोन्ही बाजूला बॅरिकेटस् बसविले जाणार आहेत. गॅरेज, रहिवासी संकुलाच्या जागीच खुली जागा ठेवून इतर संपूर्ण जागा बॅरिकेटस्ने बंदिस्त केली जाईल. रस्त्याच्या मधोमध दुजाभक असेल. गणपती मंदिर व वीज वितरण रस्ता या दोन ठिकाणी आयलँड असतील. ठिकठिकाणी गटारीचे बांधकाम केले जाणार आहे. सिव्हिलकडून येणारा रस्ता व धामणी रस्ता शंभरफुटी रस्त्याला जोडला जातो, त्याठिकाणी चौक सुशोभिकरण प्रस्तावित आहे. संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. या संपूर्ण कामांसाठी १२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

शासनाशी पत्रव्यवहार
या रस्त्याच्या कामासाठी निधीची गरज आहे. त्यासाठी आ. सुधीर गाडगीळ व सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. नगरविकास विभागातून निधीची तरतूद व्हावी, यासाठी पत्रव्यवहारही झाला आहे. जिल्हा नियोजन समितीतूनही निधीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: A hundred-fold turnout will be possible - Lokmat special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.