ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरअभावी अडकून पडले शेकडो बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:26 AM2021-05-11T04:26:37+5:302021-05-11T04:26:37+5:30
सांगली : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या टंचाईमुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये शेकडो रुग्णांचे बेड अडकले आहेत. गतवर्षापेक्षा अडीच ते तीन पटीने कॉन्सन्ट्रेटरच्या ...
सांगली : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या टंचाईमुळे जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये शेकडो रुग्णांचे बेड अडकले आहेत. गतवर्षापेक्षा अडीच ते तीन पटीने कॉन्सन्ट्रेटरच्या किमती वाढल्याने, सामाजिक संस्थांकडील या यंत्राचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सामाजिक संस्थांकडे ४०० रुग्ण या यंत्रासाठी प्रतीक्षा यादीवर असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रातील अनेक वितरकांकडील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्रे संपली आहेत. त्यातच या यंत्रांना दरवाढीचे ग्रहण लागले आहे. जे यंत्र पहिल्या कोरोना लाटेवेळी २७ ते २८ हजार रुपयांना मिळत होते, ते आता ६० हजार रुपयांवर गेले आहे. ज्याची किंमत ४८ ते ५५ हजार रुपये होती, त्या यंत्रांसाठा आता १ ते सव्वालाख रुपये मोजावे लागत होते. १८ ते ३० हजारांच्या आसपास दर असताना, अनेक दानशूर व्यक्तिंनी त्याची खरेदी करुन सामाजिक संस्थांना दिली. मात्र, आता दरवाढीमुळे हे यंत्र खरेदी करून सामाजिक संस्थांना देण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत त्याचा पुरवठा घटला आहे.
महापालिका क्षेत्रातच रुग्ण सहायता समिती, आयुष सेवाभावी संस्था, दक्षिण भारत जैन सभा, नमरा फाउंडेशन यांच्यासह आ.सुधीर गाडगीळ, मिरजेचे नगरसेवक निरंजन आवटी यांच्याकडेही काही प्रमाणात ही यंत्रे आहेत. त्यांच्याकडील यंत्रांची संख्या सध्या १५०च्या घरात आहेत, पण त्यांच्याकडील वेटिंग ४०० हून अधिक आहे. अनेकांनी पोर्टेबल मशीनला पर्याय म्हणून सिलिंडर ठेवण्यास सुरुवात केली असली, तरी पोर्टेबल मशीन हवेतून ऑक्सिजन खेचून घेत ते रुग्णाला उपलब्ध करून देते. सिलिंडरला ऑक्सिजन भरून घ्यावा लागतो.
चौकट
प्रतीक्षा यादी का वाढतेय
रुग्णांना घरी सोडल्यानंतर काही दिवस ऑक्सिजन यंत्राची गरज आहे. हे यंत्र उपलब्ध असेल, तर डॉक्टरांकडून रुग्णांना घरी सोडले जाते, अन्यथा आणखी काही दिवस निगराणीखाली ठेवण्यात येते. त्यामुळे हे बेड अडकून पडत आहेत.
चौकट
जिल्ह्यातील बेडची स्थिती
एकूण ऑक्सिजन बेड २,४५९
आयसीयू बेड ७१७
यापैकी शिल्लक बेड १७
कोट
सध्या आमच्याकडे सुमारे अडीचशेच्या आसपास वेटिंग आहे. रुग्णांच्या नातेवाइकांची मागणी वाढली आहे. यंत्र उपलब्ध नसल्याने त्यांच्या रुग्णांचा डिस्चार्ज थांबतो. यंत्रे महाग झाल्याने सामाजिक संस्थांकडे अशा यंत्रांची दान स्वरूपातील आवक जवळपास ठप्प झाली आहे.
- अमोल पाटील, आयुष सेवाभावी संस्था, सांगली