दररोज शेकडो वाहने मोडतात सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:25 AM2021-01-08T05:25:04+5:302021-01-08T05:25:04+5:30
सांगली : सीसीटीव्हीद्वारे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया रेंगाळल्याने सांगलीत दररोज शेकडो वाहने सिग्नल मोडून अपघाताला निमंत्रण देत आहेत. ...
सांगली : सीसीटीव्हीद्वारे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया रेंगाळल्याने सांगलीत दररोज शेकडो वाहने सिग्नल मोडून अपघाताला निमंत्रण देत आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाईची यंत्रणा कार्यान्वित होण्याची गरज आहे.
सांगली शहरात सध्या कॉलेज कॉर्नर, आझाद चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, विश्रामबाग चौक, विजयनगर या पाच चौकांमध्येच सिग्नल यंत्रणा सुरू आहे. महापालिका, स्टँड, सिव्हिल चौक याठिकाणचे सिग्नल बंद आहेत. मोजक्याच ठिकाणी सिग्नल यंत्रणा असतानाही त्याठिकाणी सर्रास नियम मोडले जात आहेत. कॉलेज कॉर्नर परिसरात मंगळवारी रात्री व बुधवारी सायंकाळी सिग्नल यंत्रणा मोडून वाहने दुसऱ्या रस्त्यावरील वाहनांमध्ये घुसल्याने वाद झाला होता. असे वाद वाढत आहेत. दंडात्मक कारवाईची भीती नसल्याने वाहनचालक नियम मोडत आहेत.
ज्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा सुरू आहे, त्याठिकाणी वेळेआधी व लाल सिग्नल पडल्यानंतरही वाहने सुसाट जात आहेत. त्यामुळे अन्य मार्गावरुन जाऊ पाहणाऱ्या वाहनधारकांना अडचणी येत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. काहीठिकाणी वाहतूक पोलिसांसमोर हे प्रकार होत आहेत. वाहतूक पोलिसांना सिग्नल सुरू असताना अशा बेशिस्त वाहनचालकांना पकडणे मुश्किल होत आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांमुळे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना त्रास होत आहे. त्यासाठी जलदगतीने सीसीटीव्हीद्वारे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होण्याची आवश्यकता आहे.
चौकट
सुरुवातीला लागली होती शिस्त
सीसीटीव्हीद्वारे दंडात्मक कारवाईची यंत्रणा सांगलीत सुरू झाल्यानंतर व पावत्या घरपोच होऊ लागल्यानंतर बेेशिस्त वाहनचालकांना चाप बसला होता. शिस्त लागली होती. कोरोना काळात सिग्नल यंत्रणा व ऑनलाईन दंडात्मक कारवाईची प्रक्रिया रेंगाळल्यानंतर वाहनचालक पुन्हा बेशिस्त बनले आहेत.