विट्यातील शेकडो वर्षांचा साक्षीदार होणार जमीनदोस्त
By admin | Published: October 15, 2016 08:16 PM2016-10-15T20:16:47+5:302016-10-15T20:16:47+5:30
जुन्या सातारा प्रांतातील राजधानी असलेल्या विटा शहरातील शेकडो वर्षाचा साक्षीदार असलेला बुरूज येत्या चार दिवसांत जमीनदोस्त होणार आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
विटा, दि. १५ - जुन्या सातारा प्रांतातील राजधानी असलेल्या विटा शहरातील शेकडो वर्षाचा साक्षीदार असलेला बुरूज येत्या चार दिवसांत जमीनदोस्त होणार आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या टोलेजंग स्मारकासाठी या बुरूजाची जागा मोकळी करण्याचे काम नगरपरिषदेने हाती घेतले आहे. त्यामुळे इसवी सन १८०० पूर्वीच्या या ऐतिहासिक बुरूजाच्या पाऊलखुणा नष्ट होणार आहेत.
विटा शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात मराठी राज्यावर अनेक राजे झाले. या काळात त्र्यंबक कृष्ण देशपांडे यांच्याकडे विटा भाळवणीचे ‘देशपांडेपण’ होते. त्याच काळात विटा येथे त्र्यंबकरावांनी ऐतिहासिक काळाची साक्ष देणारा वाडा, तट व बुरूज बांधल्याचे सांगितले जाते. सध्या वाडा, तट नाहीसा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असलेल्या चौकातून दक्षिणेकडे अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या बुरूजाचा ताबा ब्रिटिशांकडेही होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या ऐतिहासिक बुरूजाची मालकी सरकारकडे गेली. त्यामुळे हा बुरूज सरकारकडेच होता.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक याच बुरूजाच्या जागेवर व्हावे, अशी मागणी आण्णा भाऊ साठे स्मारक समितीने तत्कालीन आ. सदाशिवराव पाटील व विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे केली होती. त्यावेळी अण्णा भाऊप्रेमींनीही या जागेवरच स्मारक करावे, अशी मागणी लावून धरली. मात्र, ही जागा सरकारच्या ताब्यात असल्याने रितसर प्रस्ताव सादर करून बुरूजाची जागा विटा नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी राज्य शासनाला या जागेची रितसर किंमत भरून ऐतिहासिक बुरूज असलेली सर्व म्हणजेच ३०० चौ. मी. (तीन गुंठे) जागा नगरपरिषदेच्या मालकी हक्काची करण्यात आली. त्यामुळे या जागेवर आता साहित्यरत्न अण्णा भाऊंचे टोलेजंग स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, विटा शहराची शेकडो वर्षांपासून साक्ष देणारा हा ऐतिहासिक बुरूज पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दगडी बांधकाम व त्यावर पांढºया मातीचा साठा असलेला हा भलामोठा बुरूज पाडण्यासाठी तीन ते चार दिवसांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक काळाचा साक्षीदार असलेला हा बुरूज जमीनदोस्त होत असताना पाहण्यासाठी विटेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अण्णा भाऊंचे टोलेजंग स्मारक होणार...
ऐतिहासिक बुरूजाच्या जागेवर लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. परंतु, या बुरूजाची जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यामुळे राज्य शासनाला या जागेसाठी रितसर रक्कम भरून ही जागा नगरपरिषदेच्या मालकीची करण्यात आली आहे. हा बुरूज काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच या जागेवर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचे टोलेजंग स्मारक उभा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.
चौकट :
स्मारकाचे पावित्र्य राखणे गरजेचे...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे थोर साहित्यिक होते. त्यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे स्मारक ऐतिहासिक बुरूजाच्या जागी होत आहे, ही चांगली बाब आहे. आमचा त्यांच्या स्मारकाला विरोध नाही. परंतु, स्मारकाच्या बाजूलाच मटण मार्केट, दारू विक्री, ताडी-माडी विक्री अशी दुकाने असल्याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे पावित्र्य सुस्थितीत राहिले पाहिजे. ती सर्वांनीच जबाबदारी आहे. त्यासाठी नगरपरिषदेनेही अशी दुकाने अन्यत्र हलविणे गरजेचे असल्याचे मत माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी व्यक्त केले.