जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थितीचे संकेत
By admin | Published: February 15, 2017 11:26 PM2017-02-15T23:26:37+5:302017-02-15T23:26:37+5:30
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीत चुरस : शिवसेना, अपक्षांचा भाव वधारणार; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
अशोक डोंबाळे ल्ल सांगली
जिल्हा परिषदेत सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, स्थानिक विकास आघाड्याही सक्षमपणे उतरल्यामुळे, कोणीही स्वबळावर सत्ता मिळवेल, अशी स्थिती नाही. त्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम हे मातब्बर नेते जिल्हा सोडून राज्यात कुठेही फिरताना दिसत नाहीत.
जिल्हा परिषदेत गतवेळी ३३ जागा मिळवून राष्ट्रवादी आघाडीवर होती. त्याखालोखाल काँग्रेसचे २३, विकास आघाडीचे तीन, अपक्ष दोन, तर जनस्वराज्य एक असे संख्याबळ होते. सेना-भाजपला मागील निवडणुकीत खातेही खोलता आले नव्हते. यावेळी राष्ट्रवादीचे संख्याबळ वीसच्या पुढे सरकेल असे दिसत नाही. शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आटपाडी-खानापूर तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडले. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीचे नुकसान झाले आहे.
यापूर्वीच अर्धा डझन राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात व माजी मंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या वाळवा तालुक्यातही राष्ट्रवादीला निर्विवाद यश मिळेल अशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादीची या निवडणुकीत मोठी घसरण झाली आहे. जयंत पाटील हे एकमेव स्टार कॅम्पेनर दिसत आहेत. राष्ट्रवादीचे अन्य नेते व जिल्हाध्यक्ष आपल्या तालुक्यांतच अडकून पडले आहेत.
काँग्रेसही गतवेळचा आकडा गाठेल, असे चित्र नाही. पतंगराव कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांचा पलूस, कडेगाव तालुका व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जयश्रीताई मदन पाटील यांचा मिरज तालुका, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांचा शिराळा, विक्रम सावंत, सुरेश शिंदे यांचा जत तालुका वगळल्यास, इतर तालुक्यात काँग्रेसला निर्विवाद यश मिळेल अशी परिस्थिती नाही.
कदम-दादा गटाचा वादही यावेळी टोकाला गेला आहे. जत तालुक्यासह पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, दुधोंडी आणि मिरज तालुक्यातील समडोळी पंचायत समिती गण, तसेच भोसे जि. प. गटातील उमेदवार निश्चित करण्यावरून कदम-दादा गटातील संघर्ष टोकला गेला आहे. मतदानाला चार दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना, काँग्रेसच्या नेत्यांकडून एकत्रित प्रचार होताना दिसत नाही.
जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील तीन जिल्हा परिषद गट काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या मिरज तालुक्यात येतात. तेथे काँग्रेसचे प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्या समर्थकांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कवठेपिरान, समडोळी, तर राष्ट्रवादीला म्हैसाळची जागा सोडली. उर्वरित जागांवर पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी दादा घराण्याला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. समडोळी गट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या समर्थकाला काँग्रेसने सोडला आहे. पण, समडोळी गण काँग्रेसला सोडला असतानाही शेट्टीसमर्थक संजय बेले यांनी बंडखोरी केली आहे. कदमसमर्थक अशोक मोहिते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
जत तालुक्यात काँगे्रस, वसंतदादा आघाडी व राष्ट्रवादी आणि भाजप अशा तिघांमध्येच प्रमुख लढती होत आहेत. जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी जनसुराज्यचे बसवराज पाटील यांच्याशी आघाडी केली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र पाहिल्यास, कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी परिस्थिती नाही. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष असेच सत्तेचे सूत्र असणार आहे. त्रिशंकू अवस्था होणार असल्यामुळे सत्ता टिकविण्याचेही आव्हान सर्वच पक्षांच्या नेत्यांसमोर आहे.
जयंतरावांना आव्हान : रयत आघाडीचे
वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी विरुद्ध रयत विकास आघाडी यांच्यात सामना रंगणार आहे. आ. पाटील यांना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे वैभव नायकवडी यांनी आव्हान दिले आहे. वाळवा तालुक्यातील सर्वच मतदार संघात रयत विकास आघाडीने उमेदवार देऊन जयंत पाटील यांना कोंडीत पकडले आहे. बागणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांनी बंडखोरी करीत, आ. पाटील व जिल्हाध्यक्ष विलासराव शिंंदे यांना आव्हान दिले आहे. तेथून मंत्री खोत यांचे पुत्र सागर खोत हेही नशीब अजमावत आहेत. बागणी, रेठरेहरणाक्ष आणि बोरगाव येथे काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार असल्याने, राष्ट्रवादीसाठी ही डोकेदुखी आहे.
शिवसेना ठरू शकते किंगमेकर
वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील निवडणूक मैदानात असून ते रयत विकास आघाडी आणि राष्ट्रवादी उमेदवाराबरोबर लढत देत आहेत. शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचणार नाही, पण किंगमेकर निश्चितच ठरणार आहे.