जतचा द्राक्षबागायतदार दुष्काळामुळे हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 03:33 PM2019-04-25T15:33:58+5:302019-04-25T15:36:36+5:30
जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील सुमारे एक हजार क्षेत्रावर द्राक्षबागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. या द्राक्षबागा शेतकरी काढून टाकत आहेत. द्राक्ष बागांचे सांगाडेच फक्त शिल्लक राहिले आहेत. शेतकरी शिल्लक राहिलेले दगडी खांब, तारा, लोखंडी अॅँगल्सची विक्री करू लागला आहे.
गजानन पाटील
संख : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व भागातील सुमारे एक हजार क्षेत्रावर द्राक्षबागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. या द्राक्षबागा शेतकरी काढून टाकत आहेत. द्राक्ष बागांचे सांगाडेच फक्त शिल्लक राहिले आहेत. शेतकरी शिल्लक राहिलेले दगडी खांब, तारा, लोखंडी अॅँगल्सची विक्री करू लागला आहे.
बागायतदार शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट उभे राहिल्याने अक्षरश: शेतकरी देशोधडीला लागला आहे. बॅँका, खासगी सावकार, विकास सोसयट्यांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होत आहे.
तालुक्याच्या ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरचे शेततलाव बांधले आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्याखाण बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.
यावर्षी पाऊसच झाला नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व व दक्षिण भागातील सर्वच्या सर्व तलाव व दोन मध्यम प्रकल्प पाण्याअभावी डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले आहेत. तालुक्यातील २६ तलावांपैकी १८ तलाव कोरडे पडले आहेत. २ मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी मृतसंचयखाली आली आहे. तलावातील पाणीसाठा ४ टक्के शिल्लक आहे. पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. विहिरी व कूपनलिका खोदल्या तरीसुध्दा पाणी लागत नाही. द्राक्ष उत्पादनासाठी मार्च-एप्रिल महिन्यामध्ये बागांना पाणी जास्त लागते.
डिसेंबर महिन्यापासून कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. चार महिन्यांपासून बागांना पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागा वाळू लागल्या आहेत. टॅँकरने पाणी घालणे परवडत नसल्याने शेतकरी बागा काढून टाकत आहेत. बागेचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिले आहेत. शिल्लक राहिलेले दगडी खांब, तारा, लोखंडी अॅँगल्सची विक्री करण्याची वेळ द्राक्ष बागायतदारांवर आली आहे.