तुजारपूरमध्ये पत्नीसह शेजाऱ्यावर खुनी हल्ला करून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:53+5:302021-07-22T04:17:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथे आज सकाळी सुनेला आणण्याच्या कारणातून वाद झाल्यानंतर पतीने पत्नीच्या डोक्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : तुजारपूर (ता. वाळवा) येथे आज सकाळी सुनेला आणण्याच्या कारणातून वाद झाल्यानंतर पतीने पत्नीच्या डोक्यात आणि हातावर तलवारीने वार करत तिला गंभीर जखमी केले, तर हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अन्य एकावरही तलवारीने वार करून दोघांच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेने भयभीत झालेल्या पतीने राहत्या घरातील स्लॅबच्या बीमला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ९ वाजेदरम्यान घडला. यातील दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली हाेती.
पांडुरंग बाबूराव यादव-सासणे (वय ६०, रा. पवार वाडा परिसर, तुजारपूर), असे आत्महत्या केलेल्या हल्लेखोर पतीचे नाव आहे. तो गावातील सोसायटीचा माजी अध्यक्ष होता. त्याने केलेल्या हल्ल्यात त्याची पत्नी लक्ष्मी पांडुरंग यादव-सासणे (५५) आणि भांडण सोडविण्यास आलेले वसंत बाबूराव पवार (५५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांच्याही डोक्यात आणि हातावर तलवारीचे जबर वार झाले आहेत. अति रक्तस्राव झाल्याने दोघांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांच्यावर कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सर्जेराव विष्णू सासणे यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे. हल्लेखोर पांडुरंग सासणे याच्या मुलाने गावातीलच एका विवाहित महिलेशी लग्न केले आहे. त्यावरून सासणे पती-पत्नीमध्ये वाद होत होते. बुधवारी सकाळी पुन्हा याच कारणावरून वाद झाल्यावर पांडुरंग याने रागाच्या भरात तलवारीने पत्नी लक्ष्मीच्या डोक्यात आणि हातावर त्वेषाने वार केले. ही घटना घडत असताना सासणे याच्या घरासमोरून निघालेले वसंत पवार हे भांडण सोडविण्यास धावले. त्यावेळी पांडुरंग याने त्यांच्याही डोक्यात, हातावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात दोघेही रक्तबंबाळ झाले.
ही घटना घडल्यावर भयभीत झालेल्या पांडुरंग सासणे याने घराचा दरवाजा बंद करत स्वतःला कोंडून घेतले. दरम्यान, आजूबाजूच्या नागरिकांनी दोघा जखमींना उपचारासाठी इस्लामपूरला पाठविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हल्लेखोर पांडुरंग सासणे याने घरात स्लॅबच्या बीमला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तुजारपूरसारख्या लहान गावात अशी घटना घडल्याने खळबळ उडाली होती. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करत आहेत.