पतीची आत्महत्या; पत्नीचा गुदमरून मृत्यू
By admin | Published: June 16, 2017 11:19 PM2017-06-16T23:19:05+5:302017-06-16T23:19:05+5:30
पतीची आत्महत्या; पत्नीचा गुदमरून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : येथील शिक्षक कॉलनीत लिपिक पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर पत्नीचा अंथरूणातच गुदमरून मृत्यू झाला. पतीच्या आत्महत्येचे, तर पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचे कारण पोलिसांना समजले नसून, पत्नीचा व्हिसेरा पोलिसांनी राखून ठेवला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, निढळ (ता. खटाव) येथील हनुमान विद्यालयात सुनील कृष्णराव मखरे (वय ४९) हे लिपिक पदावर कार्यरत होते. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे पती-पत्नी घरातील माडीवर झोपले होते, तर त्यांची मुलगी अक्षदा ही खालच्या खोलीमध्ये झोपली होती. सकाळी बराचवेळ झाला तरी आई-बाबा का उठले नाहीत, हे पाहण्यासाठी अक्षदा माडीवर गेली असता तिला वडिलांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. तर आई अंथरुणावर निपचीत पडली होती. हा प्रकार पाहून अक्षदाने हंबरडा फोडला.
तिने फौजदार असलेल्या भाऊ अतुल यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेही तत्काळ घरी आले. त्यांनी वहिनींना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याही मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत काहीनी पुसेगाव पोलिसांनाही या प्रकाराची कल्पना दिली. त्यामुळे पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेले. डॉ. मेघना कुलकर्णी तसेच डॉ. प्रल्हाद इंजे यांनी शवविच्छेदन केले. सुनील यांचा मृत्यू गळफासाने झाला असल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले. तर अनुराधा यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र कशामुळे गुदमरला हे अद्याप स्पष्ट झाले नसून तपासानंतर खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे.
सुनील मखरे हे गेल्या २२ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी अनुराधा (वय ३९) या घरकाम करत होत्या. त्यांना अक्षदा नावाची एकुलती एक मुलगी आहे. सध्या तिने १२ वी शास्त्र शाखेत ५७ टक्के गुण मिळविले आहेत. तिला सातारा येथील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याबाबत घरात चर्चाही झाली होती.
तसेच सुनील मखरे यांनी आपल्याला शाळेतील कामाचा भयंकर त्रास होत असल्याबाबत पत्नीला वारंवार सांगितल्याचेही बोलले जात आहे. अत्यंत सुखी व आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंब म्हणून मखरे यांच्या घराकडे पाहिले जात होते. मात्र असे काय घडले की आपल्या एकुलत्या एक मुलीची काहीही काळजी न करता दोघांनीही आपली जीवनयात्रा संपवली, याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
आठ-दहा दिवसांपासून अनुराधा यांचे मौन !
गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनुराधा या काहीशा नाराज असल्याचे कॉलनीतील लोकांना जाणवत होते. शेजारील महिलांशी त्यांचे बोलणे खूपच कमी झाल्याची चर्चा आसपासच्या महिलांमध्ये होती.
गेल्या दोन दिवसांपूर्वी पती-पत्नीने घराभोवतीचा परिसर, फळ व फूल झाडांची बाग स्वच्छ केली होती. कधी-कधी पत्नी-पत्नीमध्ये किरकोळ वाद होत होते; परंतु घराबाहेर याची वाच्यता कधीही झाली नसल्याची चर्चाही आहे.