मोटेवाडीत आग लागून झोपडी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:26+5:302020-12-22T04:26:26+5:30
संख : जत तालुक्यातील मोटेवाडी (आसंगी तुर्क) येथील भाऊसाहेब आप्पा सरक यांच्या शेतातील झोपडीस अचानक आग लागली. यात धान्यासह ...
संख : जत तालुक्यातील मोटेवाडी (आसंगी तुर्क) येथील भाऊसाहेब आप्पा सरक यांच्या शेतातील झोपडीस अचानक आग लागली. यात धान्यासह एक तोळा सोने, रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मोटेवाडी (आसंगी तुर्क) गावापासून एक किलोमीटर अंतरावर सरक वस्ती आहे. भाऊसाहेब सरक हे पत्नी, आई-वडील व मुलीसह शेतात झोपडी बांधून राहत आहेत. सध्या ऊसतोडणी हंगाम असल्याने भाऊसाहेब व पत्नी गावालगत ऊसतोड करण्यासाठी गेले होते. घरी कोणीही नव्हते. सोमवारी सकाळी ११ वाजता अचानकपणे झोपडीला आग लागली. आगीत एक पोते बाजरी, एक पोते गहू, एक तोळा सोने, रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तलाठी डी. वाय. कांबळे यांनी पंचनामा केला. भाऊसाहेब सरक यांचा संसार उघड्यावर पडल्याने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
फोटो-२१संख१,२
फोटो ओळ :
जत तालुक्यातील मोटेवाडी (आसंगी तुर्क) येथील भाऊसाहेब सरक यांच्या शेतातील झोपडी आगीत जळून खाक झाली.