मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते! - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 06:46 PM2023-04-29T18:46:48+5:302023-04-29T18:48:10+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘पक्षातून जाणाऱ्यांनी जावे’ म्हणतात, मला वाटते पवार यांनीच भाजपत यावे
सांगली : मला आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह अनेकांना मुख्यमंत्री व्हावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्या तरी भाजप-शिवसेना सरकार बहुमतात व स्थिर आहे. आमदार अपात्रतेबाबत न्यायालयाचा निकालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असे वाटते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘पक्षातून जाणाऱ्यांनी जावे’ म्हणतात, मला वाटते पवार यांनीच भाजपत यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आठवले म्हणाले, भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या राज्यात सुरू असलेले पोस्टरयुध्द हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री होण्याची अनेकांची अपेक्षा असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्थान भक्कम आहे. बहुमत असताना बदलाचा विषयच नाही. शिंदे मुख्यमंत्री म्हणून २०२४ पर्यंत पदावर राहतील. सत्ता गेल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यासह काहीजण शिंदे यांच्यावर टीका करीत आहेत. आमदार अपात्रतेबाबतही शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागेल, असे वाटते. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असले तरी भविष्यात बहुमत असेल तरच मुख्यमंत्रिपद मिळेल.
दलितांना खोट्या गुन्ह्यात अडकवू नका
आठवले यांनी जनधन योजना, मुद्रा कर्ज योजना, उज्ज्वला गॅस आदी योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील दलितांवरील चोरीचे गुन्हे, ॲट्रॉसिटीबाबत आढावा घेतला. दलितांना खोट्या गुन्ह्यांत अडकवू नका, अशा सूचना प्रशासनाला केल्या.
पूरपट्ट्यातील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव द्या
मंत्री आठवले म्हणाले, कृष्णा नदीच्या पूरपट्ट्यात दरवर्षी कुटुंबांचे मोठे नुकसान होत आहे. वसाहतीत, गावांत मोठ्या संख्येने दलित, मागासवर्गीय लोक राहतात. त्यांच्या पूर्ण पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारकडे द्यावा, या कामासाठी पाठपुरावा करू.
कार्यकर्त्यांना संधी देणार
आठवले म्हणाले, राज्यात आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका भाजप-शिवसेनेसोबत आरपीआय लढविणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असेल.