जत्रा आली म्हणून सराव करणारा मी पैलवान नाही - खासदार संजय पाटील

By अविनाश कोळी | Published: June 3, 2023 08:42 PM2023-06-03T20:42:05+5:302023-06-03T20:46:41+5:30

आम्ही दोघे एकत्र असल्याने यंदा ९ लाखावर मताधिक्य जाईल, असा दावा भाजपचे खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. 

I am not a wrestler who practices because the fair has come - MP Sanjay Patil | जत्रा आली म्हणून सराव करणारा मी पैलवान नाही - खासदार संजय पाटील

जत्रा आली म्हणून सराव करणारा मी पैलवान नाही - खासदार संजय पाटील

googlenewsNext

सांगली : जत्रा आली म्हणून सराव करणारा मी पैलवान नाही. आमची तयारी कायम सुरुच असते. मागील लोकसभा निवडणुकीत मला ६ लाखावर मते मिळाली होती. आ. गोपीचंद पडळकरांना तीन लाखाच्या घरात मते होती. आम्ही दोघे एकत्र असल्याने यंदा ९ लाखावर मताधिक्य जाईल, असा दावा भाजपचे खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. 

ते म्हणाले की, काँग्रेसकडून लोकसभेची तयारी सुरु असली व त्यांचा उमेदवार ठरला तरी त्याचा आम्ही विचार करणार नाही. कोणीही आले तरी यावेळी मताधिक्यात मोठी वाढ दिसेल. काही पैलवान जत्रा आली की व्यायाम करायला सुरुवात करतात. आमचा कायमचाच सराव असतो. ते म्हणाले की, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत वीजबिलावर होणारा मोठा खर्च टाळण्यासाठी २०० मेगावॅटचा चौदाशे कोटी रुपयांचा वीज प्रकल्प केंद्र शासनाने मंजूर केला आहे. 

त्याचबरोबर म्हैसाळच्या विस्तारीत योजनेसही मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या दोन्ही योजनांचे भूमीपूजन लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. राज्य शासन विस्तारीत प्रकल्पासाठी ९७२ कोटी रुपये देणार आहे. विस्तारीत योजनेमुळे पाण्यापासून वंचित जत तालुक्यातील ६५ गावांना लाभ मिळेल.

सौर वीज प्रकल्पासाठी २०२१ मध्ये प्रस्ताव दिला होता. एका आंतरराष्ट्रीय लेखपरीक्षण संस्थेमार्फत योजनेचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर सौर प्रकल्पास शासनाकडून मान्यता मिळाली आहे. २४ ते २६ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होईल. ही योजना वीजेबाबत स्वयंपूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिलाचा भार सोसावा लागणार नाही. या कामासाठी लवकरच वर्कऑर्डर दिली जाईल.

महापालिका निवडणुकीत लक्ष घालणार
महापालिका निवडणूक जवळ आल्या आहेत. खासदार म्हणून मी या निवडणुकीत लक्ष देणार आहे. पक्षानेही जबाबदारी दिलेली आहे, असे संजय पाटील म्हणाले.

टेंभू योजनेसाठीही प्रस्ताव देऊ
म्हैसाळ योजनेप्रमाणे टेंभू उपसा सिंचन योजनाही सौरउर्जेवर चालविण्यासाठी प्रस्ताव दिला जाईल. त्याचाही आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सर्व्हे केला जाईल. जिल्ह्यातील सर्व योजना सौरउर्जेवर चालल्या तर शेतकऱ्यांना त्या परवडतील, असे पाटील म्हणाले.
 

Web Title: I am not a wrestler who practices because the fair has come - MP Sanjay Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली