पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघा, कंबरदुखी लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:28+5:302021-09-25T04:26:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून लोकांच्या दैनदिंन सवयीवर बराच परिणाम केला आहे. अनेकांना सकाळी अथवा सायंकाळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून लोकांच्या दैनदिंन सवयीवर बराच परिणाम केला आहे. अनेकांना सकाळी अथवा सायंकाळी पायी चालण्याची सवय आहे. पण निर्बंधामुळे त्यात खंड पडला आहे. सध्याच्या जीवनशैलीत पायी चालण्यापेक्षा वाहनांचा वापरही वाढत चालला आहे. ही सवय मोडल्याने नको त्या वयात गुडघा, कंबरदुखी, सांधेदुखीसारखे आजारही बळावले आहेत.
सकाळ, संध्याकाळ वाॅकिंगला जाणाऱ्यांची संख्या शहरात मोठी आहे. आमराई, महावीर उद्यानात वाॅकिंगसाठी मोठी गर्दी असते. पण कोरोनामुळे अनेकांची पायी चालण्याची सवय मोडली आहे. त्यात तरुण, मध्यमवयीनांसह वृद्धांचाही समावेश आहे. विशेषत: महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. पायी चालण्याची सवय मोडल्याने काहींना गुडघा, कंबरदुखीचा त्रास होत आहे. तर काहींना हाडाचे आजार वाढले आहे.
चौकट
या कारणासाठी होतेय चालणे
ज्येष्ठ - व्यायाम म्हणून सकाळ, संध्याकाळ
महिला - किरणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत
पुरूष - गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केली तर शतपावली
तरुणाई - गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत
चौकट
हे करून पहा
१. एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा
२. कुठलेही काम करताना सहकाऱ्यांची मदत कमीत कमी घ्या
३. घाई नसेल त्या वेळी तरी लिफ्टचा वापर टाळा
चौकट
म्हणून वाढले हाडाचे आजार
सध्या प्रत्येकाच्या घरी दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे किरकोळ कामासाठी वाहनांचा वापर वाढला आहे. अगदी भाजीपाला आणण्यापासून ते औषध दुकानापर्यंत सारेच वाहनावरून जातात. परिणामी वजन वाढून स्नायू, हाडांना त्रास जाणवू लागतो.
चौकट
पायी चालणे शक्य नाही, त्यांच्यासाठी
पायी चालल्याने शरीरातील स्नायू मोकळे होतात. दिवसभर ताजेतवाने वाटते. हाडांची हालचाल होते. प्रत्येक कामासाठी वाहनांचा वापर केल्यास वजन वाढते. त्याचा त्रास होतो. ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांनी सायकलिंग करावे, असे अस्थिरोगतज्ज्ञ डाॅ. सुबोध उगाणे यांनी सांगितले, सायकलिंग व स्वीमिंग हे दोन्ही व्यायाम पायी चालण्याला पर्याय असल्याचेही ते सांगतात.