मी शहराला पूर्ण वेळ देतो, तुम्हीच पाहुण्यासारखे येता..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:35+5:302020-12-27T04:20:35+5:30
इस्लामपूर : लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मी शहरासाठी पूर्ण वेळ देतो. मात्र, तुम्ही आठवड्यातून दोन दिवस पाहुण्यासारखे येऊन जाता. कोरोनाचा ...
इस्लामपूर : लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मी शहरासाठी पूर्ण वेळ देतो. मात्र, तुम्ही आठवड्यातून दोन दिवस पाहुण्यासारखे येऊन जाता. कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात सापडल्यावर तुम्ही दहा दिवस मुंबईत घरात टाळ्या वाजवत बसला होता ते सांगा. कोरोना काळात १ रुपयासुद्धा दिला नाही. शहरातील जनतेला हे माहीत आहे. त्यामुळे त्यांना शिकविण्याच्या फंदात पडू नका, असा हल्ला नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर चढवला.
पाटील म्हणाले, पदभार सांभाळल्यापासून आतापर्यंत आम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ११४ कोटींचा निधी ४ वर्षांत आणला. तुमची पालिकेत ३० वर्षे सत्ता असताना फक्त १०० कोटींचा निधी आणला. याची तपासणी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री असणाऱ्या भाच्यांकडून करून घ्या आणि यल्लमा चौकात वेळ देऊन जाहीरपणे सांगा. तुमचा आमदार निधी शहरासाठी किती खर्च झाला? शहरासाठी आलेल्या निधीला कोणी स्थगिती दिली. ९ कोटी ५० लाखांचा निधी शासनाने कसा मागे घेतला याची उत्तरे द्या?
ते म्हणाले, इतरांपुढे प्रश्न निर्माण करायचे, विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची भाषा वापरायची. मंत्रिपदाच्या अधिकाराचा वापर सूडबुद्धीने करणे योग्य आहे का? सध्या ते मोजक्या प्रभागात जात आहेत ही आनंदाची बाब आहे. मात्र, ज्यांचे मोकळे प्लॉट बळकावले, ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सावकारी जाचाला कंटाळून ज्यांनी आत्महत्या केल्या त्या घराकडे कधी जावेसे वाटले नाही का? आणि वर नगराध्यक्षांना वेळ नाही असे धांदात खोटे बोलता, याला जनता भुलणार नाही.
यावेळी प्रसाद पाटील, चंद्रकांत पाटील, धैर्यशील मोरे, संदीप सावंत, भास्कर कदम उपस्थित होते.