'जयंत पाटील यांचा 'कार्यक्रम' करण्याची ऑफर भाजपाने दिली होती'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 03:51 PM2019-08-02T15:51:02+5:302019-08-02T17:02:19+5:30
जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची ऑफर भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला दिली होती. मात्र आमदारकी, मंत्रिपद मिळविण्यासाठी आपण कधीही राजारामबापूंच्या घराण्याशी गद्दारी करणार नाही, अशी भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केली.
सांगली : जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची ऑफर भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला दिली होती. मात्र आमदारकी, मंत्रीपद मिळविण्यासाठी आपण कधीही राजारामबापूंच्या घराण्याशी गद्दारी करणार नाही, अशी भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केली.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ गुरुवारी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झाला. यावेळी दिलीपतात्या पाटील यांनी गौप्यस्फोट करताना, भाजपच्या ऑफरची माहिती भाजप नेत्यांच्या उपस्थितीतच दिली. ते म्हणाले की, भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला ऑफर देताना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याविषयी सांगितले होते. ही ऑफर केवळ पक्षप्रवेशापुरती नव्हती, तर जयंत पाटील यांच्याविरोधात मला उभे करून जयंत पाटील यांचा कार्यक्रम करण्यापर्यंतची होती. ही ऑफर मी धुडकावली. राजारामबापूंनी मला मानसपुत्र मानले होते. संपूर्ण राज्यात माझी आजही तशीच ओळख आहे. आमदारकी, मंत्रीपदे मिळविण्यापेक्षा राजारामबापूंचा मानसपुत्र ही पदवी माझ्यासाठी महत्त्वाची आहे.
राजारामबापूंच्या प्रेमापोटी आम्ही त्यांच्या पश्चात जयंत पाटील यांना राजकारणात आणले. त्यांना साथ देत आजपर्यंतचा प्रवास केला. क्षमता असूनही मला पदे मिळाली नसली तरी, त्याचे दु:ख वाटत नाही. वाळव्यातून सांगलीपर्यंतच्याराजकारणात येईपर्यंत मला चाळीस वर्षांचा काळ लागला. राजकारणात हा विलंब खूप मोठा आहे. तरीही त्याबद्दल मला खंत वाटत नाही. पद मिळविण्यासाठी बापूंच्या वारसांसोबत गद्दारी करण्याचे कृत्य माझ्याकडून होणार नाही, अशा शब्दातच मी ती आॅफर धुडकावली. राजारामबापूंसारखा मोठ्या मनाचा माणूस मी अन्यत्र पाहिला नाही. त्यांनी माझ्यासारख्या प्राथमिक शिक्षकाच्या मुलाला राजकारणात आणून राज्यात, देशात आणि परदेशातही फिरविले. माझ्या आयुष्यात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टींमागे राजारामबापूंचे ऋण आहेत, असे ते म्हणाले.