सिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करू : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 03:50 PM2020-02-08T15:50:02+5:302020-02-08T15:52:28+5:30
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करून कवठेमहांकाळ, तासगावसह जिल्ह्यातील शंभर टक्के गावांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे, शासनाकडून लागेल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न आहे, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.
सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करून कवठेमहांकाळ, तासगावसह जिल्ह्यातील शंभर टक्के गावांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे, शासनाकडून लागेल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न आहे, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.
पाटबंधारे कार्यालयात तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ताकारी, म्हैसाळ योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जलसंपदामंत्री पाटील यांनी सांगलीत अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. जूनची मुदत असल्याने ती कामे पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर गतीने प्रयत्न आहेत. जिल्ह्यातीलच योजना नव्हे, तर महाराष्ट्रातील सिंचन योजनांची सर्व कामे पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न चालू आहे. पाणी योजना पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता केली जात आहे.
कोणत्याही योजनांची कामे अपूर्णावस्थेत थांबणार नाहीत, याबाबतची दक्षता घेण्यात आली आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांत ताकारी व म्हैसाळ योजनेचे पाणी गेलेले नाही. तासगावमधील सहा गावांचा समावेश आहे. त्यासाठी आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी वंचित गावांना पाणी देण्याबाबत चर्चा केली आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचित गावांना लवकरच पाणी उपलब्ध करुन दिले जाईल. जिल्ह्यातील गावांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
आ. सुमनताई पाटील, सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, अर्जुन पाटील यांनी, तालुक्यातील काही गावांना पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली. यावर जयंत पाटील यांनी, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करुन त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, दत्ताजीराव पाटील, भानुदास पाटील, सागर पाटील, अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे उपस्थित होते.