जनतेच्या प्रेमासाठी चोवीस तास सेवक म्हणून उभा राहीन, रोहित पाटील यांनी दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 06:11 PM2024-09-03T18:11:22+5:302024-09-03T18:13:53+5:30
मळणगावात ‘कर्तव्य यात्रे’चा सांगता समारंभ
कवठेमहांकाळ : विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ‘कर्तव्य यात्रा’ काढली. या कर्तव्य यात्रेमध्ये मी गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलो. शिवाय वाड्या-वस्त्यांनाही भेटी दिल्या. कर्तव्य यात्रेत कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने माझ्यावर प्रेम केले आणि या प्रेमाची उतराई म्हणून जनतेसाठी चोवीस तास सेवक म्हणून उभा राहीन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी दिली.
रोहित पाटील यांच्या कर्तव्य यात्रेचा सांगता समारंभ मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे पार पडला. यावेळी रोहित पाटील बोलत होते. सांगता समारंभाच्या अगोदर रोहित पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी शिरढोण ते मळणगाव, अशी हजारो कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढली. या पदयात्रेचेही मळणगाव सभेत रूपांतर केले.
रोहित पाटील म्हणाले, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती व तरुणांच्या हाताला काम तसेच शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हेच या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक आबांनी व सुमनताई पाटील यांनी केली आहेच; परंतु उर्वरित प्रश्न सोडवण्याची माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीतून मी तसूभरही मागे सरकणार नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील म्हणाले, आमच्या विरोधकांनी आम्ही विश्वासघात केला, असे सांगत सुटले आहेत. मात्र, कवठेमहांकाळ, नगरपंचायत, तासगाव पंचायत समितीमध्ये कोणी गद्दारी केली, हे सर्वांना माहीत आहे. तरीही आमच्या विरुद्ध आरोप केले जातात. माझ्या पुतण्याविरोधात विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची भाषा होते. खरंतर लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु शिकार करण्याची भाषा ही सामान्य माणसाला न पटणारी आहे. रोहितविरोधात निवडणुकीच्या मैदानात याच जनता आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर तुम्हाला अस्मान दाखवू, असा इशारा त्यांनी दिला.
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोहित पाटील यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासन युवा नेते शंतनू सगरे यांनी दिले.
दिग्विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले व अजित शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला आमदार सुमनताई पाटील, अनिता सगरे, विकास हकके, दादासाहेब कोळेकर, सुरेखा कोळेकर, कुमार पाटील, चंद्रशेखर सगरे, अमित कोळेकर, मळणगावच्या सरपंच सुरेखा जाधव, साधना कांबळे, मीनाक्षी माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.