महापालिका क्षेत्रातील आयसीयू बेड फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:09+5:302021-05-16T04:25:09+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रातील आयसीयू बेड फुल्ल झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सायंकाळपर्यंत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची धावाधाव झाली. बेड ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील आयसीयू बेड फुल्ल झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सायंकाळपर्यंत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची धावाधाव झाली. बेड मिळण्यासाठी दुसऱ्या रुग्णांच्या कोरोनामुक्तीची प्रार्थना अनेकांना करावी लागत आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात सध्या २८ रुग्णालयांमध्ये एकूण ४३२ आयसीयू बेड आहेत. यातच व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री बेड इन्फर्मेशन सिस्टिमवर आयसीयू बेडची उपलब्धता शून्य दर्शविली गेली. कॉल सेंटरमधूनही तसा संदेश चौकशी करणाऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे ज्यांना आयसीयू बेडची गरज होती, अशा रुग्णांवर उपचारासाठी त्यांच्या नातेवाइकांची धावाधाव झाली.
शनिवारी सायंकाळी विविध रुग्णालयातील ६ बेड रिकामे झाल्यानंतर त्याठिकाणी वेटिंगवर असलेल्या रुग्णांना जागा मिळाली. ग्रामीण भागातूनही अनेक रुग्ण शुक्रवारी सायंकाळी सांगलीत बेडसाठी फिरत होते. महापालिका क्षेत्रात १ हजार ११७ वॉर्ड बेड असून त्यापैकी २१२ बेड उपलब्ध आहेत. मात्र, वॉर्ड बेडपेक्षा आयसीयू बेडची अधिक गरज भासत आहे. त्यामुळेच रुग्णांच्या नातेवाइकांची पळापळ सुरू आहे.
चौकट
नगरसेवकाकडे गर्दी
सांगलीतील नगरसेवक अभिजीत भोसले यांच्याकडे शुक्रवारी रात्री अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी एकाचवेळी धाव घेतली. व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन बेडची आवश्यकता असलेल्या तासगाव तालुक्यातील एका रुग्णासाठी भोसले यांनाही धावाधाव करावी लागली.