नाट्यरंगभूमीवर पुन्हा पदार्पण करण्याचा विचार

By admin | Published: November 6, 2014 10:44 PM2014-11-06T22:44:39+5:302014-11-06T23:00:08+5:30

प्रकट मुलाखत : ज्येष्ठ रंगकर्मी जब्बार पटेल यांनी सांगलीतील कार्यक्रमात व्यक्त केला मनोदय

The idea of ​​making a re-entry on the playground | नाट्यरंगभूमीवर पुन्हा पदार्पण करण्याचा विचार

नाट्यरंगभूमीवर पुन्हा पदार्पण करण्याचा विचार

Next

सांगली : सध्याच्या नाट्यअवकाशात मी योग्य कथा आणि कादंबरीच्या शोधात आहे. आजच्या काळातील भाषा मला सहजगत्या अवगत होईल, असे वाटत नाही. परंतु असे असले तरीही चांगल्या कथेच्या प्रतीक्षेत मी असून, प्रदीर्घ काळानंतर लवकरच नाट्यरंगभूमीवर पदार्पण करण्याचा विचार आहे. बघूया काय होते ते.., असे मत विष्णुदास भावे गौरव पदक सन्मानित ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मनमोकळ्या संवादात व्यक्त केले.
डॉ. पटेल यांना रंगभूमीदिनानिमित्त येथे विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आयोजित मुलाखतीत डॉ. पटेल बोलत होते. नाट्यदिग्दर्शक डॉ. दयानंद नाईक आणि लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
मला भावे गौरव पदक मिळाले असले तरी, मी कोणत्याही प्रकारचे नाट्य प्रशिक्षण घेतलेले नसल्याचे सांगून डॉ. पटेल म्हणाले की, तुम्हाला समाजात घडणाऱ्या विविध घटनांकडे बारकाईने पाहण्याची दृष्टी असणे गरजेचे आहे. नाटकवेड्या माणसाला संध्याकाळचे सात वाजले की हमखास नाटकांची आठवण येतेच. अर्थात नाटकाचे वेड हे असेच असायला पाहिजे. सध्या मला अनेकजण म्हणतात की, कोणतीही कथा आणि कादंबरी घ्या आणि त्यावर नाटक अथवा चित्रपटाची निर्मिती करा; परंतु हे अशक्य आहे. कारण असे कधीच होत नाही. लेखक आणि दिग्दर्शक यांची भाषा एकरूप होणे गरजेचे आहे. मी आतापर्यंत जी निर्मिती केली आहे, त्याकडे रसिकांनी चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास त्यांना याचा प्रत्यय येईल. मला लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. तरुणपणी मी प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत माझे गुरू विजय तेंडुलकर लिखित कथेवर आधारित नाटकात सहभाग घेतला होता. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुझपाशी’ या नाटकात मी भूमिकाही केली.
डॉक्टरी पेशा स्वीकारल्यानंतर मी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे प्रॅक्टिस सुरू केली. तरीही मला नाटक काही स्वस्थ बसू देईना. त्यामुळे नाटकाच्या तालमी करण्यासाठी मी जवळपास रोज पुण्याला ये-जा करीत असे. असा माझा दिनक्रम जवळपास १९७१ ते १९९७ पर्यंत सुरू होता. या काळात ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशांचा तमाशा’ रंगमंचावर आले. उत्तम नाटके निर्माण व्हावीत यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याने त्याला रसिकांनी प्रतिसाद दिला.
माणसाने सतत कार्यमग्न असणे गरजेचे असते. माझ्या जीवनात मला विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, विजया मेहता यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्याचा फायदा मला पुढील वाटचालीसाठी नक्कीच झाला. नाटक, चित्रपटापेक्षा चरित्रपटाचे कार्य अवघड असते. त्यामध्ये उत्तुंग कार्यकर्तृत्व असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सखोल अभ्यास करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे त्याचे दैवतीकरण होणार नाही, याचीही खबरदारी बाळगावी लागत असल्याचेही डॉ. पटेल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

दूरदर्शन क्षेत्रात काम नाही
सध्या डेली सोपचे फॅड आहे. दूरदर्शनवर सुरू असलेल्या या मालिकांमधील मुख्य दोष म्हणजे बहुतांशी मालिकांची कथाच तयार नसते. टीआरपी जसा बदलत जाईल, त्याप्रमाणात मालिकांची कथादेखील बदलत जाते. या प्रकाराला काहीही अर्थ नाही. वाट फुटेल तिकडे जाणारा कथाप्रकार मला मान्य नाही. तुमच्या डोक्यात तुमची कथा तयार पाहिजे. मग भले कमी भागात मालिका संपली तरी हरकत नाही. परंतु कथेत तडजोड करण्याची माझी वृत्ती नसल्याने भविष्यकाळात मी दूरदर्शन क्षेत्रात कार्य करीन, असे मला वाटत नसल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.

Web Title: The idea of ​​making a re-entry on the playground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.