आटपाडीची ओळख ‘अधिकाऱ्यांचा तालुका’ अशी व्हावी !

By admin | Published: August 4, 2016 12:34 AM2016-08-04T00:34:32+5:302016-08-04T01:27:14+5:30

अमरसिंह देशमुखांची तळमळ : खेबूडकर कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन; तालुक्यात पाणी व्यवस्थापनाची गरज

The identity of Atpadi should be 'Taluka of the officers'! | आटपाडीची ओळख ‘अधिकाऱ्यांचा तालुका’ अशी व्हावी !

आटपाडीची ओळख ‘अधिकाऱ्यांचा तालुका’ अशी व्हावी !

Next

अविनाश बाड -आटपाडी--प्यायला पाणी नाही, कायम दुष्काळी परिस्थिती, ओळखच दुष्काळी भाग अशी. तसेच जगण्यासाठी गोदीमध्ये जाऊन काम करणारी, मेंढरं घेऊन कोकणामध्ये जाणारी आणि वर्षानुवर्षे ऊस तोडायला जाणारी माणसं, ही तालुक्याची दुसरी ओळख. पण येत्या पाच वर्षात ही ओळख पुसायची आहे. हिरवा तालुका आणि अधिकाऱ्यांचा तालुका अशी नवी ओळख निर्माण करणे आपले स्वप्न आहे, अशी तळमळ रविवारी जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी जाहीरपणे व्यक्त केली. इथल्या नेत्यांची स्वप्नं बदलू लागली, तालुक्याचं चित्र बदलेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
येथील दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीने माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून बांधलेल्या आबासाहेब खेबूडकर ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या इमारतीचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याहस्ते करण्यात आले. वास्तविक अवघ्या महिन्यापूर्वी आटपाडीत माजी मंत्री अजित पवार आले होते. त्यांच्याहस्ते पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाची इमारत तयार असताना आणि महाविद्यालयाच्या आवारातच कार्यक्रमाचे आयोजन केलेले असताना, त्यावेळी उद्घाटन करण्यात आले नाही. त्यासाठी रविवारी स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आला. व्यासपीठावर राजकारणी मंडळी असूनही राजकारणविरहित केवळ शैक्षणिक आणि तालुक्याची ओळख बदलासाठीची घोषणा होणारा हा तालुक्यातील पहिला कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात बोलताना अविनाश धर्माधिकारी म्हणाले, आटपाडीतील स्वागताचा हा माझा शेवटचा कार्यक्रम समजा. मी या तालुक्यातील तरुणांना युपीएससी आणि एमपीएससीसाठी सर्वतोपरी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यास तयार आहे. अमरसिंह देशमुख यांच्या तळमळीची त्यांनी प्रशंसाही केली. ते म्हणाले, उत्तर प्रदेश आणि बिहारला मागे टाकणारी अधिकाऱ्यांची संख्या आपण आटपाडी तालुक्यातून निर्माण करू. राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, टेंभूचे पाणी आले म्हणून केवळ विकास होणार नाही, त्याचे नियोजन हवे. दिशा देणाऱ्या नेत्याची गरज आहे. देशमुखांनी गावोगावच्या शेतकऱ्यांना एकत्रित करून तलावातून थेट शेतकऱ्यांच्या शेतात सामूहिक ठिबक सिंचन पद्धतीने शेती करण्यासाठी गेले वर्षभर रान उठविले आहे. आटपाडी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पश्चिमेकडून पूर्वेकडे उताराची आहे. जागोजागी सर्वच तलाव बांधले आहेत. ओढ्याने जरी ‘टेंभू’च्या पाण्याने तलाव भरले आणि पाण्याची आवर्तने ठरविली तर, सामूहिक ठिबक सिंचन पद्धतीमुळे तालुका हिरवागार होेण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातली सर्वात मोठी शिक्षण संस्था त्यांच्याकडे आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांच्या गुणवत्तेला वाव मिळाला, संधी मिळाली, तर हे स्वप्न सत्यात उतरणे शक्य आहे. मात्र या मंडळींना त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह परिसरातील नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिक्षणात राजकारणाचा अडसर येणार काय?
पुण्या-मुंबईसह आटपाडीत शिकून शहरात स्थायिक झालेले अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी रविवारी येथे आल्या होत्या. त्यांच्याकडे पाहून ते आटपाडीचे वाटतच नव्हते. यातील ज्येष्ठ मंडळींना स्वत: खुर्ची उचलून देताना हर्षवर्धन देशमुखही दिसले. त्या मंडळींचं एवढंच म्हणणं होतं की, आटपाडीत शिक्षणाची सोय झाली नसती, तर आम्ही शहरात दिसलो नसतो. आता सामूहिक ठिबक सिंचनला परवानगी न देण्यात राजकारण आहे म्हणतात. मग स्पर्धा परीक्षेमध्येही अडसर निर्माण होणार काय? आणि देशमुख त्यावर कशी मात करणार? यावर स्वागतार्ह स्वप्नाचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: The identity of Atpadi should be 'Taluka of the officers'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.